भारतातील हायवेंवर रात्रीच्या वेळी होणारे अपघात हा अत्यंत गंभीर चिंतेचा विषय बनत चालला आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो आणि रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अहवालानुसार, देशात होणाऱ्या एकूण प्राणघातक अपघातांमध्ये ट्रक्स, ट्रॅक्टर्स आणि बसेस यांसारख्या जड व्यावसायिक वाहनांचा वाटा सर्वाधिक आहे.
रात्रीच्या वेळी हायवेवर होणाऱ्या अपघातांमागे चालकाचा अतिवेग, थकवा आणि डुलकी लागणे हीचं मुख्य कारणे असतात. यावर तातडीने उपाय म्हणून रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने आता केवळ ड्रायव्हर्सच्या कामाच्या तासांवरच नाही, तर वाहनांच्या तंत्रज्ञानावरही कडक नियम लागू करण्यास सुरुवात केली आहे.
१. ड्रायव्हर्ससाठी कामाचे तास आणि केबिनमध्ये आरामाचे नियम
लांब पल्ल्याच्या प्रवासात ट्रक्स आणि बसेसचे ड्रायव्हर्स सतत १० ते १२ तास विश्रांतीशिवाय गाड्या चालवतात, ज्यामुळे त्यांना काही सेकंदांची डुलकी लागते आणि अपघात होतात. यावर उपाय म्हणून सरकारने चालकांच्या ड्रायव्हिंगचे तास मर्यादित करण्याचे धोरण आखले आहे, ज्यानुसार ठराविक तासांनंतर अनिवार्य विश्रांती घेणे बंधनकारक असेल. याशिवाय, चालकाचा थकवा कमी करण्यासाठी मंत्रालयाने १ ऑक्टोबर २०२५ पासून सर्व नवीन ट्रक्सच्या केबिनमध्ये AC अनिवार्य केले आहे, ज्यामुळे चालकाला उष्णतेमुळे होणारा थकवा टाळता येईल.
२. स्लीप डिटेक्शन कॅमेरे आणि ADAS
केवळ नियमांवर अवलंबून न राहता, MoRTH ने वाहनांमध्येच तंत्रज्ञानाचा वॉच ठेवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. १ जानेवारी २०२८ पासून सर्व हेवी कमर्शियल वाहनांमध्ये ‘ड्रायव्हर ड्रॉझिनेस डिटेक्शन अँड अलर्ट सिस्टीम’ अनिवार्य करण्यात आली आहे.
हे कसे काम करेल?
गाडीच्या केबिनमध्ये चालकासमोर एक विशेष ‘इन्फ्रारेड कॅमेरा’ आणि सेन्सर्स बसवलेले असतात. हा कॅमेरा चालकाच्या डोळ्यांच्या हालचाली, पापण्या मिटण्याचा वेळ आणि चेहऱ्याचे हावभाव यावर बारीक लक्ष ठेवतो.
अलर्ट सिस्टीम
जर चालकाने २ सेकंदांपेक्षा जास्त वेळ डोळे बंद केले किंवा त्याला डुलकी लागली, तर गाडीमध्ये त्वरित एक अलार्म वाजतो आणि स्टिअरिंगवर वायब्रेशन होते, ज्यामुळे चालक जागा होतो.
वाहनावरील नियंत्रण
या सिस्टीमसोबतच ‘लेन डिपार्चर वॉर्निंग’ (LDWS) आणि ‘ॲडव्हान्स्ड इमर्जन्सी ब्रेकिंग’ (AEBS) देखील जोडले जात आहे, जेणेकरून डुलकी लागून गाडी लेनबाहेर गेल्यास गाडी स्वतःहून ब्रेक लावून वेग कमी करेल.
NCRB च्या आकडेवारीनुसार होणारे हायवेवरील अपघात रोखण्यासाठी तंत्रज्ञान ही आता काळाची गरज बनली आहे. MoRTH चे हे नवीन नियम आणि स्लीप डिटेक्शन तंत्रज्ञान कमर्शियल ड्रायव्हर्सचे मानसिक आरोग्य सुधारण्यास आणि रस्त्यावरील प्रवाशांचे प्राण वाचवण्यास मदतशील ठरेल यात शंका नाही.






