नवी दिल्ली – महाविकास आघाडीचे सरकार कोसळ्यानंतर राज्यात शिंदे-भाजप सरकार सत्तेत आलं. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीत दाखल झाले. आज ते पंतप्रधान नरेंद्र मोदींची सदिच्छा भेट घेणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांची भेट घेतली. त्यानंतर, माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शिवसेनेचे किती खासदार तुमच्या संपर्कात आहेत?, असा सवाल उपमुख्यमंत्री फडणवीस ( Devendra Fadnavis )यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी आकडा सांगून टाकला आहे.
बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेचे खासदारही शिंदे गटात सामील होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबईतील खासदार राहुल शेवाळे यांच्या पाठोपाठ आता पालघरचे शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठींबा देण्याची मागणी केली आहे. तसेच, शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांनी देखील एकनाथ शिंदेंवर कारवाई न करण्याची विनंती केली होती. त्यामुळे शिवसेनेचे खासदार एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यापार्श्वभूमीवर फडणवीसांना हा सवाल उपस्थित करण्यात आला होता.
देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, शिवसेनेचा एक खासदार आमच्या संपर्कात आहे. त्यांचं नाव श्रीकांत शिंदे आहे, असे स्पष्टीकरण फडणवीस यांनी दिलं आहे. श्रीकांत शिंदे हे एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आहेत. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यापासून श्रीकांत शिंदे हे उद्धव ठाकरे यांच्या बैठकांना उपस्थित राहिले नाहीत. त्यानंतर त्यांनी शक्तीप्रदर्शन करुन आपली ताकद दाखवली होती.