अहिल्यानगरमध्ये बिबट्याचा चिमूरडीवर हल्ला (फोटो- सोशल मीडिया)
अहिल्यानगर तालुक्यातील खारेकर्जुने येथील घटना
अंत्यविधी न करण्याचा ग्रामस्थांचा निर्णय
शाळा बंद ठेवण्याचा खारेकर्जुने ग्रामस्थांचा निर्णय
अहिल्यानगर: खारेकर्जुने (ता. अहिल्यानगर) येथे बिबट्याने बुधवारी सायंकाळी उशीरा रियंका (वय ५) या चिमुरडीला उचलून नेत जिवे ठार मारले. या घटनेने संतापलेल्या ग्रामस्थांनी गुरुवारी (दि. १३) गाव, शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. बिबट्या जेरबंद होत नाही, तो पर्यत मुलीवर अंत्यविधी न करण्याचा निर्णय संतप्त ग्रामस्थांनी घेतला आहे. आक्रमक ग्रामस्थांमुळे काही काळ तणाव निर्माण झाला.
खारेकर्जुने येथे बुधवारी सायंकाळी सातच्या सुमारास शेतात शेकोटी करत असताना तुरीच्या शेतातून बिबट्या आला. त्याने रियांका सुनिल पवार या मुलीला उचलून धूम ठोकली. या घटनेमुळे गावासह परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. रात्रभर मुलीचा शोध ग्रामस्थांनी घेतला. गुरुवारी सकाळी येथील शाळेच्या मागील बाजूस हिंगणगाव रस्त्यालगत मुलीचा मुतदेह सापडला. बिबट्याने मुलीच्या हाता-पायाला जखमा केल्याचे दिसून आले. घटनेच्या निषेधार्थ खारेकर्जुने ग्रामस्थांनी बैठक घेतली.
Pune Leopard Attack: तीन जणांचा जीव घेणारा नरभक्षक बिबट्या ठार; शार्प शूटर पथकाने थेट…
बिबट्या जेरबंद होत नाही तोपर्यंत गाव बंद ठेवण्यात येईल, मुलीचा अंत्यविधी केला जाणार नाही, शाळा बंद ठेवणार असे निर्णय ग्रामस्थांनी घेतले. बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या मुलीच्या नातेवाईकांना शासकीय मदत मिळावी या मागणीचे निवेदन पंचायत समितीचे माजी उपसभापती डॉ. दिलीप पवार यानी तहसीलदार संजय शिंदे यांना दिले.
मंत्री विखे पाटील वनविभागावर संतापले
जिल्ह्यात बिबट्यांकडून होत असलेल्या हल्ल्यांच्या घटना रोखण्यासाठी वनमंत्री गणेश नाईक यांच्याशी चर्चा करून अधिकची यंत्रणा कार्यान्वित करण्यास सांगितले आहे. उपाययोजनांसाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी देण्याची तयारी असल्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. जिल्ह्यात ११५० बिबटे असल्याचा अंदाज असून यापैकी २५ बिबटे पकडले आहेत. यावरून वनविभागाच्या हलगर्जीपणावर मंत्री विखे पाटील यांनी संताप व्यक्त केला.
Leopard News: ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण! आता ‘या’ भागात झाले बिबट्याचे दर्शन
जिल्ह्यात ३५० पिंजरे लावले आहेत. ४ थर्मल ड्रोन्स, ४ ट्रॅग्युलायझेशन गन्स आणि २५० ट्रॅप कॅमेरे कार्यान्वित असले तरी बिबट्यांचा वावर चिंताजनक आहे. जिल्ह्यातील वाढत्या घटना रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सूचनेनुसार बैठक घेऊन अधिकचे उपाय करण्याचा निर्णय घेतला. असे असले तरी वनविभागाने आवश्यक यंत्रणा कार्यान्वित करण्यात दाखवलेल्या निष्क्रीयतेवर मंत्री विखे पाटील यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. वनमंत्री गणेश नाईक यांच्याशी चर्चा करून जिल्ह्यातील घटनांचे गांभिर्य लक्षात आणून दिले आहे. जिल्ह्यासाठी २२ रेस्क्यू वाहन, अतिरीक्त पिंजरे, ट्रॅग्युलायझेशन गन, कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करून ड्रोनद्वारे स्थळ निरीक्षणासाठी अधिकची यंत्रणा, त्यासाठी निधी उपलब्ध करून देवू मात्र वनविभागाने किमान प्रस्ताव पाठवले पाहिजेत, अशा शब्दात मंत्री विखे पाटील यांनी नाराजी व्यक्त केली.






