महाज्योती अधिछात्रवृत्ती रखडली (फोटो- सोशल मिडिया)
प्रत्यक्ष रक्कम न मिळाल्याने विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणी
विद्यार्थ्यांमध्ये पसरली तीव्र नाराजी
अधिछात्रवृत्ती योजनेत निधीअभावी निर्माण झाली समस्या
पुणे: महाज्योती संस्थेच्या संशोधक अधिछात्रवृत्ती योजनेत (Career) निधीअभावी निर्माण झालेल्या अडचणींमुळे राज्यातील ओबीसी, भटके विमुक्त आणि एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. मंजुरीनंतरही प्रत्यक्ष रक्कम न मिळाल्याने विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
सन २०२३ मध्ये जाहीर झालेल्या धोरणानुसार बार्टी, सारथी आणि महाज्योती या संस्थांसाठी समान निकष लागू करण्यात आले होते. मात्र, बार्टीसाठी २०० तर सारथी आणि महाज्योतीसाठी प्रत्येकी ५० विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती देण्याचा निर्णय घेतल्याने विद्यार्थ्यांनी असमानतेचा मुद्दा उपस्थित केला होता. या निर्णयाविरोधात विविध ठिकाणी आंदोलनांसह फुले वाडा ते मुंबई असा लाँग मार्च काढण्यात आला होता.
दीर्घ आंदोलनानंतर १० ऑक्टोबर २०२४ रोजी नोंदणी दिनांकापासून अधिछात्रवृत्ती मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार बार्टी आणि सारथी संस्थांना निधी वितरित करण्यात आला; मात्र महाज्योती संस्थेला अद्याप पुरेसा निधी उपलब्ध झालेला नाही. परिणामी, संबंधित विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्तीचा लाभ मिळण्यात विलंब होत आहे.
विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, मागील अडीच वर्षांपासूनची थकबाकी प्रलंबित असून, जुलै ते डिसेंबर २०२५ या कालावधीतील अधिछात्रवृत्ती फेब्रुवारी २०२६ पर्यंत मिळणे अपेक्षित होते. मात्र एप्रिल मध्यापर्यंत सुमारे ९०० विद्यार्थ्यांपैकी अत्यल्प विद्यार्थ्यांनाच रक्कम प्राप्त झाल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, कागदपत्र पडताळणीसाठी पूर्वी नागपूर येथेच व्यवस्था होती. यंदा विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी राज्यातील सात ठिकाणी केंद्रे सुरू करण्यात आली; मात्र या बदलानंतरही प्रक्रिया वेगाने न होता विलंब वाढल्याची तक्रार आहे. प्रशासनातील कर्मचाऱ्यांचे अपुरे प्रशिक्षण आणि कार्यपद्धतीतील त्रुटींमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.
महाज्योतीचे कोणतेही प्रशिक्षण बंद नाही! विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार ऑनलाईन प्रशिक्षणाचा निर्णय
विद्यार्थ्यांमध्ये संभ्रंम
‘स्टायफंड शीट’ उपलब्ध करून न देणे, पात्र विद्यार्थ्यांची यादी जाहीर न करणे आणि केवळ त्रुटींची माहिती देणे यामुळे संभ्रम निर्माण झाल्याचेही विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. महाज्योती प्रशासनाशी संपर्क साधण्यात अडचणी येत असल्याची तक्रारही करण्यात येत आहे.
अधिछात्रवृत्ती वेळेवर मिळेना
दीड वर्षांपूर्वी मंजूर झालेली नोंदणी दिनांक पासूनची अधिछात्रवृत्ती मिळावी यासाठी विद्यार्थी प्रतीक्षेत असताना मागील सहा महिन्याची अधिछात्रवृत्ती वेळेवर मिळत नाही व या बाबतची प्रक्रियेत पारदर्शकपणा नसल्याने महाज्योतीच्या विद्यार्थीच्या नशिबी केवळ प्रतीक्षाच आहे असेच म्हणावे लागेल.
महाज्योती संचालक विद्यार्थ्यांच्या कोणत्याही मेजेस व फोन प्रतिसाद देत नाहीत. नवीन संचालक रुजू झाल्यापासून विद्यार्थ्यांच्या मनामध्ये महाज्योतीच्या कारभाराविषयी प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. स्टायफंड शिट जनरेट न होणे व याद्या न लावने हे गैरकारभाराचे लक्षण आहे.
-बापू घुंगरगावकर महाज्योती संशोधक विद्यार्थी
विविध अभ्यासक्रम आणि स्पर्धा परीक्षेतील उमेदवारांसाठी ‘महाज्योती’चे आर्थिक पाठबळ
पूर्वी नागपूर येथेच कागदपत्र तपासणी केली जात होती. यंदा राज्यातील सात ठिकाणी ही प्रक्रिया केली जात असताना देखील अद्याप अधिछात्रवृत्ती प्रदान करण्याची प्रक्रिया पूर्ण केली गेली नाही. याचे खरे कारण माहीत असून योग्य वेळी या बाबतची माहिती पुराव्यांसह मुख्यमंत्र्यांना पाठवणार आहे.
-सद्दाम मुजावर महाज्योती संशोधक विद्यार्थी






