नागपूर : आतापर्यंत शहर व परिसरातील 1368 अवैध बांधकामे हटविण्यात आली असून, गेल्या वर्षभरात 451 अवैध (Illegal Construction) बांधकाम पाडण्यात आले आहे, अशी माहिती महापालिकेने (Nagpur Municipal Corporation) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दिली.
अजय तिवारी यांनी जिल्ह्यातील सर्वच अनधिकृत बांधकाम तोडण्यात यावीत, अशी मागणी करणारी जनहित याचिका नागपूर खंडपीठात दाखल केली होती. पुढे त्यांनी यातून माघार घेतली. मात्र, हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असल्याने न्यायालयाने स्वत:हून ही जनहित याचिका चालिवण्याचा निर्णय घेतला. मागील वर्षी एप्रिल महिन्यात झालेल्या सुनावणी दरम्यान न्यायालयात शहरातील एकूण अनधिकृत बांधकामे असल्याचे समोर अवैध बांधकामांची तपशीलवार माहिती सादर करण्यात आली होती.
यात मनपाच्या हद्दीतील 1544, नागपूर सुधार प्रन्यासच्या हद्दीतील 4675 तर नागपूर महानगर प्राधिकरणाच्या हद्दीतील 3019 बांधकामांचा समावेश आहे. त्यामुळे एकट्या शहरात सहा हजारांहून अधिक अनधिकृत बांधकामे समोर असल्याचे समोर आले आहे. अलीकडेच 11 जुलै रोजी मनपा आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यात आत्तापर्यंत 1368 अवैध बांधकामे पाडण्यात आल्याचे समोर आले आहे.