फोटो सौजन्य - Social Media
आजकाल कमी वयात केस पांढरे होण्याची समस्या अनेक तरुणांमध्ये वाढताना दिसते. शालेय-महाविद्यालयीन वयातच किंवा वीसाव्या वर्षांतच पांढरे केस दिसू लागले, की अनेक जण टेन्शनमध्ये जातात. मात्र, यासाठी घाबरण्याची गरज नाही. थोडेसे कारण समजून घेतले आणि योग्य उपाय केले, तर ही समस्या बऱ्याच प्रमाणात नियंत्रणात आणता येऊ शकते. कमी वयात केस पिकण्यामागे अनेक कारणे असू शकतात. अनुवंशिकता हे त्यातील एक महत्त्वाचे कारण आहे. आई-वडिलांना लवकर पांढरे केस असतील, तर पुढच्या पिढीतही ही समस्या दिसू शकते. याशिवाय सततचा ताण-तणाव, झोपेची कमतरता, चुकीची जीवनशैली, पोषणतत्त्वांचा अभाव, धूम्रपान, दारू तसेच केमिकलयुक्त हेअर प्रॉडक्ट्सचा अतिवापर यामुळेही केस लवकर पांढरे होतात.
केस पांढरे होण्याचे मुख्य कारण म्हणजे मेलानिन या रंगद्रव्याचे कमी होणे. शरीराला आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे वेळेवर मिळाली नाहीत, तर मेलानिनचे उत्पादन कमी होते. त्यामुळे केसांचा नैसर्गिक काळा रंग हळूहळू फिकट पडू लागतो. जर तुम्हालाही ही समस्या भेडसावत असेल, तर काही सोपे उपाय दैनंदिन जीवनात अवलंबून पाहा. सर्वात आधी तुमच्या आहाराकडे लक्ष द्या. हिरव्या पालेभाज्या, डाळी, कडधान्ये, फळे, दूध, दही, अंडी यांचा आहारात समावेश करा. विशेषतः आयर्न, व्हिटॅमिन B12, झिंक आणि कॉपरयुक्त पदार्थ केसांसाठी फायदेशीर ठरतात.
तणाव कमी करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. रोज किमान 7 ते 8 तासांची झोप घ्या. योग, ध्यान किंवा प्राणायाम केल्याने मानसिक ताण कमी होतो आणि त्याचा सकारात्मक परिणाम केसांवरही दिसून येतो. मोबाईल, लॅपटॉपचा अतिवापर टाळणे आणि नियमित व्यायाम करणे देखील उपयुक्त ठरते. घरगुती उपायांमध्ये आवळा हा केसांसाठी अत्यंत लाभदायक मानला जातो. आवळ्याचे तेल किंवा आवळ्याचा रस केसांना लावल्यास केसांची मुळे मजबूत होतात आणि नैसर्गिक रंग टिकून राहण्यास मदत होते. नारळ तेलात कढीपत्ता किंवा काळी मेंदी घालून गरम करून ते तेल आठवड्यातून दोनदा केसांना लावल्यास चांगला फायदा होतो. भृंगराज तेलाचाही नियमित वापर केस पिकण्याची प्रक्रिया मंदावू शकतो.
केमिकलयुक्त डाए, शॅम्पू किंवा स्ट्रेटनिंगसारख्या उपचारांपासून शक्यतो दूर राहा. सौम्य, हर्बल शॅम्पू वापरणे आणि केसांवर अनावश्यक प्रयोग न करणे अधिक योग्य ठरते. तसेच धूम्रपान आणि दारूचे सेवन टाळल्यास केसांसह संपूर्ण आरोग्य सुधारते. थोडक्यात सांगायचे झाले, तर कमी वयात केस पांढरे होणे ही आजच्या धावपळीच्या जीवनशैलीची देण आहे. मात्र, योग्य आहार, तणावमुक्त जीवन, नैसर्गिक उपाय आणि थोडी काळजी घेतली, तर ही समस्या फार मोठी राहात नाही. त्यामुळे टेन्शन न घेता आजपासूनच केसांच्या आरोग्याकडे लक्ष द्या.






