फोटो सौजन्य - Social Media
पत्रकारिता करणाऱ्या पत्रकाराला काळ-वेळ याचं भान राहत नाही. एकदा पत्रकारितेच्या क्षेत्रात पाऊल ठेवलं की, कधीही, कुठेही आणि कोणत्याही परिस्थितीत बातमीसाठी धावावं लागतं. राहुल हा एका नामांकित वृत्तवाहिनीतील धडाडीचा क्राईम रिपोर्टर असतो. दिवसभर शहरभर फिरून गुन्हे, अपघात आणि विविध घटनांचं वार्तांकन करून तो त्या रात्री थकून घरी परततो. जेवण आटोपून तो लवकर झोपतो. मात्र मध्यरात्री अचानक त्याच्या मोबाईलची रिंग वाजते. गाढ झोपेतून दचकून उठलेल्या राहुलची नजर मोबाईलच्या स्क्रीनवर जाते. रात्रीचे साडेबारा वाजलेले असतात आणि स्क्रीनवर त्याचे ब्युरो चीफ मनोज पगाडे यांचं नाव झळकत असतं.
राहुल तातडीने कॉल उचलतो. फोनच्या दुसऱ्या बाजूने घाईघाईचा आवाज येतो. “राहुल… लगेच मुंबई-नाशिक हायवेवर सद्गुरू ढाब्याजवळ ये. इथे भीषण अपघात झाला आहे. ही मोठी बातमी आहे. वेळ घालवू नकोस.” एवढं बोलून फोन कट होतो. बॉसची ऑर्डर आणि पत्रकार म्हणून असलेलं कर्तव्य या दोन्ही गोष्टी राहुलसाठी महत्त्वाच्या असतात. तो क्षणाचाही विलंब न करता कॅमेरा, माईक आणि आवश्यक साहित्य घेतो आणि आपल्या गाडीतून घटनास्थळाच्या दिशेने निघतो.
रात्र काळ्याकुट्ट असते. अधूनमधून विजांचा कडकडाट होत असतो. पावसामुळे रस्ता ओलाचिंब झालेला असतो. काही अंतर पार केल्यानंतर परिसर अधिकच निर्मनुष्य वाटू लागतो. सद्गुरू ढाब्याजवळ पोहोचताच राहुलला काहीतरी विचित्र जाणवतं. वातावरणात एक अजब शांतता असते. ना वाहनांचा आवाज, ना माणसांची चाहूल. त्या ठिकाणी पाय ठेवताच त्याच्या मनात एक अनामिक भीती दाटून येते. तो लगेच मनोज यांना फोन लावण्याचा प्रयत्न करतो, पण फोन लागत नाही. पुन्हा प्रयत्न करतो, तरीही काहीच प्रतिसाद मिळत नाही.
आजूबाजूला नजर फिरवत असताना त्याला रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल दरीसारख्या भागात एक रिक्षा उलटलेली दिसते. राहुल कॅमेरा हातात घेऊन धावत खाली उतरतो. रिक्षेजवळ पोहोचताच त्याच्या अंगावर अक्षरशः काटा उभा राहतो. रिक्षाचालकाचं रक्ताने माखलेलं शरीर स्टिअरिंगवर कोसळलेलं असतं. समोरील काच फुटल्यामुळे त्याचा चेहरा बाहेर आलेला असतो. मागच्या सीटवर बसलेला प्रवासीही रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असतो. त्याचा चेहरा इतका विद्रूप झालेला असतो की त्याची ओळख पटणं अशक्य असतं.
राहुल पोलिसांना फोन करण्यासाठी मोबाईल काढतो; मात्र त्या परिसरात मोबाईलला नेटवर्कच नसतं. तो पुन्हा पुन्हा मनोज यांना फोन करण्याचा प्रयत्न करतो, पण प्रत्येक वेळी कॉल फेल होतो. भीतीने त्याच्या कपाळावर घाम फुटतो. तरीही पत्रकार म्हणून आपलं कर्तव्य पूर्ण करण्याचा निर्धार करत तो कॅमेरा सुरू करतो आणि हातात माईक घेऊन रिपोर्टिंग सुरू करतो.
‘पिवळ्या तेजाने सजली काळी रात्र!’ वरात आली सोबत बांगड्यांचा आक्रोश… ते दोघे आणि छबिना!
“मुंबई-नाशिक हायवेवर मध्यरात्री भीषण अपघात झाला असून…” राहुल एवढंच बोलत असतो, तेवढ्यात त्याच्या कानावर मंद आवाज येतो. “राहुल…” तो क्षणात मागे वळून पाहतो. पण मागे कोणीच नसतं. तो स्वतःला समजावतो की कदाचित भीतीमुळे भास झाला असेल. पुन्हा रिपोर्टिंग सुरू करतो.
पुन्हा तोच आवाज… “राहुल…” यावेळी आवाज अधिक स्पष्ट असतो.
राहुलच्या हातातील माईक थरथरू लागतो. तो घाबरून चारही बाजूंना पाहू लागतो; पण त्या अंधारात त्याला कुणीच दिसत नाही. इतक्यात दूरवरून पोलिसांच्या गाडीचा सायरन ऐकू येतो. राहुलच्या जीवात जीव येतो. काही क्षणांत पोलीस घटनास्थळी पोहोचतात. पंचनामा सुरू होतो. एक पोलीस कर्मचारी रिक्षाचालकाची तपासणी करतो, तर इन्स्पेक्टर मागच्या सीटवर बसलेल्या प्रवाशाच्या खिशात ओळखीचा कोणताही पुरावा शोधू लागतो. त्याला एक वॉलेट सापडतं.
वॉलेटमधून एक प्रेस आयडी कार्ड बाहेर काढलं जातं. त्यावर नाव लिहिलेलं असतं… “मनोज पगाडे – ब्युरो चीफ.”
इन्स्पेक्टर काही क्षण स्तब्ध होतो. तो राहुलकडे येतो आणि विचारतो, “तू इथे कसा आलास?” राहुल शांतपणे उत्तर देतो, “माझे बॉस मनोज पगाडे यांनी मला फोन करून इथे बोलावलं.” हे ऐकताच इन्स्पेक्टरच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव उमटतात. तो काही क्षण राहुलकडे पाहत राहतो आणि गंभीर आवाजात म्हणतो, “काय बोलतोयस तू? मनोज पगाडे तर या रिक्षेत मृत अवस्थेत पडले आहेत.”
हे शब्द ऐकताच राहुलच्या पायाखालची जमीन सरकते. “क… काय?” थरथरत्या हातांनी तो मोबाईल काढतो आणि कॉल हिस्ट्री उघडतो. मात्र… साडेबारा वाजता आलेल्या कोणत्याही कॉलची नोंद त्याच्या मोबाईलमध्ये नसते. जणू काही… तो फोन कधी आलाच नव्हता.
राहुल हादरलेल्या अवस्थेत घरी परततो. रात्रभर त्याच्या डोळ्याला डोळा लागत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी तो कॅमेऱ्यातील फुटेज पाहण्यासाठी लॅपटॉप सुरू करतो. सुरुवातीचं सर्व फुटेज अगदी व्यवस्थित असतं. मात्र शेवटच्या काही सेकंदांत त्याची नजर एका गोष्टीवर खिळते. रिक्षेच्या मागे एक माणूस शांतपणे उभा असतो. राहुल व्हिडिओ थांबवून झूम करतो. तो माणूस… मनोज पगाडे असतात. राहुलच्या हातून माऊस खाली पडतो.
तेवढ्यात व्हिडिओमध्ये मनोज हळूहळू कॅमेऱ्याकडे वळतात. त्यांच्या रक्ताने माखलेल्या चेहऱ्यावर एक भेसूर हास्य उमटतं. ते सरळ कॅमेऱ्याकडे बोट दाखवत म्हणतात… “पुढची बातमी… तुझी आहे, राहुल…” क्षणात व्हिडिओ बंद होतो. त्याच वेळी राहुलचा मोबाईल वाजतो. थरथरत्या हातांनी तो स्क्रीनकडे पाहतो. स्क्रीनवर फक्त एकच नाव झळकत असतं…
“Manoj Pagade Calling…”
(टीपः आम्ही देत असणारे हे आर्टिकल काही व्यक्तींसह घडलेले अनुभव आहेत. मात्र आम्ही कोणतीही अंधश्रद्धा पसरवत नाही तर हे आर्टिकल केवळ माहिती आणि मनोरंजनाकरिता असून Navarashtra.com यासाठी कोणतीही पुष्टी देत नाही)






