गांजा विक्रीवर पोलिसांचा आणखी एक घाव; ४२५ ग्रॅम गांजासह आरोपी अटकेत
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, किरण सुभाष वाघमारे हा गांजा विक्रीसाठी परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार मध्यवर्ती पोलिसांनी सापळा रचला. आरोपी घटनास्थळी येताच पोलिसांनी त्याला रंगेहात ताब्यात घेतले. तपासादरम्यान आरोपीच्या ताब्यातून सुमारे ४२५ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. त्यानंतर त्याच्याविरुद्ध संबंधित कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, याच शास्त्रीनगर परिसरातून अवघ्या दहा दिवसांपूर्वीही एका अमली पदार्थ विक्रेत्याला अटक करण्यात आली होती. त्यामुळे या भागात अमली पदार्थांच्या पुरवठ्याचे जाळे सक्रिय असल्याची शक्यता पोलिसांकडून तपासली जात आहे. मध्यवर्ती पोलिसांनी शहरात अमली पदार्थांची विक्री आणि तस्करी रोखण्यासाठी गुप्त माहितीच्या आधारे सातत्याने कारवाया सुरू ठेवल्या असून, या रॅकेटमागील मुख्य सूत्रधार आणि पुरवठादारांचा शोध घेण्यासाठी तपासाची व्याप्ती वाढविण्यात आली आहे.
दरम्यान, शहरातील तरुणांमध्ये वाढत्या अमली पदार्थांच्या वापराला आळा घालण्यासाठी पोलिसांनी नागरिकांना संशयास्पद हालचालींची माहिती तात्काळ पोलिसांना देण्याचे आवाहन केले आहे. तसेच अशा बेकायदेशीर धंद्यांविरोधात भविष्यातही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
याआधीही उल्हासनगर शहरात अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात विठ्ठलवाडी पोलिसांनी मोठी कारवाई करत 3 किलो 329 ग्रॅम गांजासह एका आरोपीला अटक केली आहे. या कारवाईत आरोपीकडून गांजासह मोबाईल फोन आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली असून, या प्रकरणात आणखी एक आरोपी फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उल्हासनगर कॅम्प-4 येथील आदर्शनगर परिसरात एक संशयित व्यक्ती गांजा विक्रीसाठी येणार असल्याची गुप्त माहिती पोलीस उपनिरीक्षक बंकटस्वामी दराडे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी आणि पोलीस निरीक्षक चंद्रहार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाची स्थापना करण्यात आली.






