'स्किल इंडिया'मुळे घडेल 'ब्रँड इंडिया'; Navbharat-Navarashtra Education Conclave मध्ये आशिष शेलार यांचा विश्वास
मुख्य अतिथी म्हणून संबोधित करताना शेलार यांनी सांगितले की, आज जगभरातील मोठ्या कंपन्या भारतात गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत. या संधीचा लाभ घेण्यासाठी देशभरात कुशल आणि प्रशिक्षित मनुष्यबळाचे सक्षम इकोसिस्टम उभारणे आवश्यक आहे. सरकार आणि शैक्षणिक संस्थांनी एकत्रितपणे आधुनिक, कौशल्याधारित शिक्षणाला चालना दिल्यास भारताची जागतिक स्तरावरील स्पर्धात्मकता अधिक मजबूत होईल.
आशिष शेलार यांनी सांगितले की, उत्कृष्ट पायाभूत सुविधा शहरांचा विकास करतात; मात्र मूल्याधिष्ठित आणि नैतिक शिक्षण देणारे शिक्षकच देशासाठी जबाबदार नागरिक घडवतात. त्यामुळे प्रत्येक शिक्षकाने राष्ट्रनिर्मितीतील आपली भूमिका अधिक प्रभावीपणे पार पाडली पाहिजे.
बदलत्या जागतिक परिस्थितीत शिक्षणाचा उद्देश केवळ पदवी देणे नसून विद्यार्थ्यांना रोजगार, कौशल्य आणि उद्योजकतेसाठी सक्षम बनवणे असावा, असे शेलार यांनी स्पष्ट केले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) आणि स्किल इंडिया मिशन हे या परिवर्तनाचे महत्त्वाचे आधारस्तंभ असल्याचे त्यांनी नमूद केले.तसेच यावेळी शैक्षणिक संस्थांनी उद्योगांच्या गरजांनुसार अभ्यासक्रम तयार करून विद्यार्थ्यांना जागतिक स्पर्धेसाठी सक्षम करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सर्व शिक्षकांना शुभेच्छा देताना शेलार म्हणाले की, आई-वडिलांनंतर शिक्षक हेच जीवनातील पहिले गुरु असतात. अशा पवित्र दिवशी शिक्षण क्षेत्राला समर्पित कार्यक्रम आयोजित करणे अत्यंत अर्थपूर्ण आहे. तसेच आजचा युवा शिक्षणपद्धती, परीक्षा प्रणाली, पात्रता आणि करिअरच्या संधींबाबत आपले विचार मांडू इच्छितो. अशा वेळी नवभारत-नवराष्ट्रसारख्या माध्यम समूहाने योग्य विषयांवर समाजात सकारात्मक चर्चा घडवून आणणे महत्त्वाचे कार्य आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील स्किल इंडिया मिशनने कौशल्य विकासाला नवी दिशा दिली असून, भारतात वाढणाऱ्या गुंतवणुकीमुळे अपस्किलिंग, रोजगार आणि उद्योजकतेच्या अनेक संधी निर्माण होत असल्याचे शेलार यांनी सांगितले. तसेच कोणताही गुंतवणूकदार एखाद्या राज्यात गुंतवणूक करण्यापूर्वी तेथील मानव संसाधनाची गुणवत्ता तपासतो. त्यामुळे उद्योगांच्या अपेक्षांनुसार कुशल आणि सक्षम मनुष्यबळ तयार करणे ही शैक्षणिक संस्थांची मोठी जबाबदारी आहे.
या कॉन्क्लेव्हमध्ये शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या राज्यभरातील शिक्षणतज्ज्ञ, प्राचार्य आणि विविध शैक्षणिक संस्थांना ‘नवभारत एज्युकेशन अवॉर्ड’ देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाला नवभारत समूहाचे मुख्य परिचालन अधिकारी श्रीनिवास राव, नवभारतचे स्थानिक संपादक बृजमोहन पांडे, नवराष्ट्रचे कार्यकारी संपादक संजय मलमे यांच्यासह शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
कॉन्क्लेव्हमध्ये कौशल्याधारित शिक्षण, उद्योग-शिक्षण समन्वय, रोजगारक्षम अभ्यासक्रम आणि भारताला जागतिक शिक्षण व कौशल्य क्षेत्रात अग्रस्थानी नेण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवरही सखोल चर्चा करण्यात आली.






