(फोटो सौजन्य: Pinterest)
ट्रिपची योजना करताना बहुतेक लोक डोंगराळ प्रदेश किंवा समुद्रकिनाऱ्यांची निवड करतात. डोंगर आपल्याला निसर्गसौंदर्य, थंडावा आणि ट्रेकिंगचा आनंद देतात तर बीच लोकेशन्स आराम, रोमँस आणि साहसाने भरलेले असतात. पण काही समुद्रकिनारे असे आहेत जे दिवसा तर सुंदर दिसतातच, पण रात्री त्यांच्या सौंदर्याला वेगळ्याच जादूची जोड मिळते. अशा ठिकाणांना बायोल्युमिनेसंट बीचेस म्हटलं जातं.
रात्री समुद्राच्या लाटांवर निळसर प्रकाश उमटताना दिसतो, जणू कोट्यवधी तारे समुद्रात उतरले आहेत. इतकंच नाही, तर वाळूवरही हा झगमगाट अनुभवता येतो. शांततेत लाटांचा आवाज आणि निळ्या उजेडाने चमकणारा समुद्र हा क्षण खरोखर आयुष्यभर लक्षात राहतो. मात्र, हा नजारा वर्षभर पाहायला मिळत नाही. साधारणपणे सप्टेंबर ते नोव्हेंबर हा काळ यासाठी सर्वात योग्य मानला जातो.
बायोल्युमिनेसन्स म्हणजे काय?
ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे ज्यामध्ये काही सागरी जीव रासायनिक प्रतिक्रियेच्या मदतीने स्वतः प्रकाश निर्माण करतात. या प्रकाशाला कोल्ड लाईट किंवा थंडा प्रकाशही म्हटलं जातं. ठराविक ऋतूंमध्ये आणि ठराविक जागी हे जीव समुद्राच्या पाण्यात दिसतात आणि समुद्र उजळून निघतो.
१. मट्टू बीच, कर्नाटक
कर्नाटकातील मट्टू बीच हा यासाठी प्रसिद्ध आहे. येथे बायोल्युमिनेसन्स पाहण्यासाठी पूर्ण अंधारातली रात्र किंवा अगदी पहाटेचा वेळ योग्य मानला जातो. मात्र, पौर्णिमेच्या रात्री येथे जाणं टाळावं कारण चंद्रप्रकाशामुळे नजारा स्पष्ट दिसत नाही.
२. हैवलॉक बीच, अंडमान
अंडमानचे बीचेस दिवसा आकर्षक आणि साहसपूर्ण असतातच, पण रात्री बायोल्युमिनेसन्समुळे त्यांचं सौंदर्य दुप्पट होतं. हैवलॉक आयलंड बीच हे यासाठी सर्वात लोकप्रिय आहे. येथे दिसणारा हा अनुभव पर्यटकांच्या मनात कायमस्वरूपी घर करून जातो.
३. अगाती आणि बंगारम बीच, लक्षद्वीप
लक्षद्वीप हे भारतातील एक अद्वितीय द्वीपसमूह आहे. इथे चारही बाजूंनी समुद्राचं अप्रतिम सौंदर्य पाहायला मिळतं. विशेषतः अगाती बीच आणि बंगारम बीच येथे बायोल्युमिनेसन्सचा अनुभव पर्यटकांसाठी एक अविस्मरणीय क्षण ठरतो.
४. बेतालबातिम बीच, गोवा
गोवा म्हटलं की बीच, नाईटलाइफ आणि रंगतदार संस्कृती आठवते. पण येथे काही बीचेस शांत वातावरण आणि नैसर्गिक चमत्कारांसाठी ओळखले जातात. त्यापैकी बेतालबातिम बीच हा बायोल्युमिनेसन्स प्लँक्टनसाठी प्रसिद्ध आहे. सुवर्णवाळू आणि शांततेत न्हालेलं हे ठिकाण निसर्गप्रेमींसाठी एक खास गंतव्य ठरतं. जर तुम्हाला निसर्गाचा एक वेगळाच आणि जादुई अनुभव घ्यायचा असेल, तर हे बायोल्युमिनेसंट बीचेस नक्की भेट द्या. रात्री समुद्राच्या लाटा चमकताना पाहणं हा अनुभव शब्दांत व्यक्त करणं खरंच कठीण आहे!