केस गळतीमुळे हैराण झाला आहात? मग घरीच बनवा ताज्या रसरशीत आवळ्यांचे शुद्ध तेल
आवळ्याचे संपूर्ण शरीराला होणारे फायदे?
आवळ्याचे तेल बनवण्याची कृती?
आवळ्याच्या तेलाचा वापर कसा करावा?
संपूर्ण देशभरात थंडीचे वारे वाहू लागले आहेत. थंडगार वातावरणात त्वचेसोबतच केस सुद्धा अतिशय कोरडे आणि निस्तेज होऊन जातात. याशिवाय केसांमध्ये कोंडा होण्याची जास्त शक्यता असते. दमट वातावरणाचा परिणाम केसांवर झाल्यानंतर केसांची गुणवत्ता खराब होऊन जाते. त्यामुळे केसांची खूप जास्त काळजी घ्यावी. कोंडा झाल्यानंतर केस खूप जास्त गळू लागतात. केसांची मूळ कमकुवत होणे, सहज केस तुटणे इत्यादी समस्या वाढू लागल्यानंतर दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करून केसांची गुणवत्ता सुधारावी. केस गळणे, अकाली केस पांढरे होणे, कोरडे होणे, निर्जीव केस इत्यादी समस्या वाढू लागल्यानंतर महिला बाजारात उपलब्ध असलेल्या हेअर केअरचा वापर करतात. मात्र असे न करता घरगुती उपाय करून केसांची काळजी घ्यावी.(फोटो सौजन्य – istock)
थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात आवळे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. आवळ्याचे सेवन केल्यामुळे शरीरालाच नाहीतर त्वचा आणि केसांना सुद्धा भरमसाट फायदे होतात. आयुर्वेदामध्ये आवळा अमृतासमान मानला जातो.कारण आवळ्याचे शरीराला असंख्य फायदे होतात. यामध्ये विटामिन सी, अँटीऑक्सिडंट्स आणि आवश्यक फॅटी ॲसिड्सयुक्त घटक आढळून येतात. आवळ्याचे सेवन केल्यामुळे केवळ केसांचं नाहीतर संपूर्ण शरीराला भरपूर पोषण मिळते. बाजारात आवळ्यापासून बनवलेले अनेक पदार्थ मिळतात. पण काही पदार्थांमध्ये केमिकल घटकांचा वापर केला जातो. आज आम्ही तुम्हाला केसांच्या वाढीसाठी आवळ्याचे तेल बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हे तेल आठड्यातून दोनदा केसांवर लावल्यास केसांच्या समस्या कमी होतील.
आवळ्याचे तेल बनवण्यासाठी सर्वप्रथम, आवळे स्वच्छ धुवून बारीक तुकडे करा. ताजे कापून घेतलेले आवळे उन्हात काहीवेळ सुकवण्यासाठी ठेवा. कढईमध्ये खोबऱ्याचे तेल गरम करण्यासाठी ठेवा. गरम तेलात सुकवलेले आवळे किंवा आवळ्याची पावडर घालून काहीवेळ शिजवून घ्या. तेलाचा रंग हळूहळू बदलण्यास सुरुवात होईल. तयार केलेले तेल थंड झाल्यानंतर गाळून घ्या. तेल बॉटलमध्ये भरून ठेवा. तयार केलेले तेल आठवड्यातून एकदा किंवा दोनदा केसांवर लावल्यास केसांच्या वाढीवर सकारात्मक परिणाम दिसून येतील. याशिवाय केसांच्या बऱ्याच समस्यांपासून आराम मिळेल.
आवळ्याचे तेल कोमट करून केसांच्या मुळांपासून ते टोकांपर्यत सगळीकडे लावून रात्रभर तसेच ठेवा. यामुळे केसांना भरपूर पोषण मिळेल. केसांच्या मुळांवर तेलाने मसाज केल्यास केसांमधील रक्त भिसरण सुधारेल. केसांच्या वाढीसाठी आवळ्याचे तेल अतिशय प्रभावी ठरते. आवळ्यामध्ये विटामिन -सी आणि अँटीऑक्सिडंट्स आढळून येतात, ज्यामुळे अकाली केस पांढरे होत नाही. आवळ्याचे तेल केसांना लावल्यास रक्तभिसरण सुधारते आणि केसांच्या वाढीस प्रोत्साहन मिळते.






