हृदयाशी संबंधित आजाराचा त्रास
मायट्रल, ट्रायकस्पिड, पल्मोनरी आणि ॲऑर्टिक नावाच्या या चार झडपा आहेत. या झडपांना त्यांच्या प्रकाराप्रमाणे काही पाती असतात- जी हृदय आकुंचन पावल्यावर उघडतात आणि रक्ताला पुढील वाट करून देतात. दोन ठोक्यांच्यामध्ये ही पाती बंद होतात. ही पाती उघडणे आणि बंद होण्याच्या प्रक्रियेमध्ये अडथळा निर्माण झाला, तर हृदयावर आणि पर्यायाने फुप्फुसावर जास्त ताण वाढू शकतो. यामुळे झडपांवर परिणाम होऊ शकतो ज्यामुळे ते खूप सैल किंवा खूप अरुंद होतात, ज्यामुळे हृदयाला प्रभावीपणे रक्त पंप करण्यास अडथळा येतो.
स्टेनोसिस आणि रेगर्गिटेशन हे हृदयाच्या झडपांचे दोन मुख्य प्रकार आहेत. डॉ बिपीनचंद्र भामरे, मुंबईतील सर एचएन रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरचे सल्लागार कार्डियाक सर्जन यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. (फोटो सौजन्य – iStock)
हृदयाच्या झडप रोगांचे प्रकार
हृदयाच्या झपडांचे किती आहेत प्रकार
झडप छोटी अथवा आकुंचित होणे (स्टेनोसिस) : यामध्ये झडप जाड होते आणि पाती एकमेकांना चिकटतात. पर्यायाने रक्त बाहेर जाण्यासाठी अडथळा निर्माण होतो आणि हृदयाच्या कप्प्यामधील दाब वाढतो. ॲऑर्टिक झडप आणि मायट्रल झडप हे सर्वांत जास्त प्रमाणामध्ये छोटे होतात. यामुळे शरीराला होणारा रक्तपुरवठा कमी होतो.
झडप गळकी होणे (रेगुरजिटेशन): यामध्ये झडपांची पाती पूर्णपणे बंद होत नाहीत आणि पुढे गेलेले रक्त त्याच कप्प्यात परत येते. यामुळे हृदयावर जास्त रक्त पंप करायला लागून ताण वाढतो. कालांतराने यामुळे थकवा, खोकला, श्वास घेणे आणि झोपताना श्वास घेण्यास त्रास होणे यासारखी लक्षणे दिसू शकतात ज्यामुळे निद्रानाश होतो
हृदयाच्या झडपांच्या आजाराची कारणे
काय आहेत कारणे
जन्मजात दोष : काही लोक जन्मतःच हृदयाच्या झडपाच्या विकृतीसह जन्माला येतात ज्याला जन्मजात झडप रोग असेही म्हणतात. या दोषांमुळे व्हॉल्व्हचा आकार चुकीचा असू शकतो किंवा योग्यरित्या जोडलेली नसतात. जेव्हा एक किंवा अधिक हृदयाच्या झडपांचा विकास योग्यरित्या होत नाही तेव्हा जन्मजात झडप रोग उद्भवतो, ज्यामुळे हृदयाच्या झडपांना योग्यरित्या बंद होण्यापासून प्रतिबंध होतो. यामुळे हार्ट फेल्युअर, विस्तारित कार्डिओमायोपॅथी आणि महाधमनी धमनीविकार यासारख्या विविध गंभीर आरोग्य स्थिती होऊ शकतात.
वाढते वय : वाढत्या वयाबरोबर ऱ्हदयाच्या झडपा दाट आणि कडक होऊ लागतात, ज्यामुळे रक्त प्रवाह मर्यादित होतो. कॅल्शियममुळे वॅाल्ववर द्रव जमा होऊ शकते ज्यामुळे त्यांची लवचिकता कमी होते. यामुळे महाधमनी स्टेनोसिस सारख्या आरोग्य स्थितीची शक्यता लक्षणीयरीत्या वाढू शकते.
संक्रमण : एंडोकार्डायटिस हा हृदयाच्या झडपांसह हृदयाच्या आतील अस्तरांच्या संसर्गाचा एक प्रकार आहे. विविध जीवाणू किंवा बुरशी या हृदयाच्या वॅाल्ववर हल्ला करू शकतात ज्यामुळे गंभीर गुंतागुंत निर्माण होऊ शकते. परिणामी, खराब झालेले वॅाल्व योग्यरित्या कार्य करू शकत नाहीत, ज्यामुळे स्टेनोसिस किंवा रेगर्गिटेशन होऊ शकते
हेदेखील वाचा – १०० वर्षांहून अधिक काळ जगण्यासाठी किचनमधील ‘हा’ पदार्थ ठरेल गुणकारी
काळजी
कशी घ्यावी काळजी
रुग्णाच्या जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी वेळेवर निदान आणि व्यवस्थापन महत्वाचे आहे. नवीन औषधे लक्षणे कमी करण्यास मदत करतात. आधुनिक उपचारांमधील तांत्रिक प्रगतीमुळे शस्त्रक्रियांमधील जोखीम कमी आहे. तुमचे डॉक्टर तुमच्यासाठी योग्य उपचार पद्धती ठरवतील. कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका आणि वेळीच निदान व उपचार करा.