बद्धकोष्ठता कमी करण्यासाठी घरगुती उपाय
शरीरात साचून राहिलेले विषारी घटक आरोग्यासाठी अतिशय हानिकारक आहेत. यामुळे पोटासंबंधित समस्या, आतड्यांसंबंधित समस्या, बद्धकोष्ठता इत्यादी अनेक समस्या उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे नेहमी पोट स्वच्छ असणे आवश्यक आहे. पोट स्वच्छ न झाल्यामुळे मानसिक संतुलन बिघडून जाते. शरीरात निर्माण झालेली पाण्याची कमतरता, शारीरिक हालचालींचा अभाव, जंक फूडचे अतिसेवन, मानसिक तणाव, अपुरी झोप इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम पचनक्रियेवर दिसून येतो. पचनक्रिया बिघडल्यानंतर पोट स्वच्छ न होणे, मलावष्टंभाची समस्या इतर अनेक समस्या त्रास देऊ लागतात. काहींना सकाळी उठल्यानंतर सगळ्यात आधी कोमट किंवा गरम पाणी पिण्याची सवय असते. मात्र या पाण्याचे सेवन करूनसुद्धा शरीरातील घाण स्वच्छ होत नाही.(फोटो सौजन्य – iStock)
पोट स्वच्छ न झाल्यामुळे पोट गच्च वाटणे, खाण्यापिण्याच्या इच्छा न होणे, मानसिक तणाव इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. अनेक लोक बद्धकोष्ठतेचा समस्या उद्भवल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य औषध घेतात. मात्र नेहमी नेहमी गोळ्या औषध घेणे किडनीच्या आरोग्यासाठी चांगले नाही. म्हणून आज आम्ही तुम्हाला बद्धकोष्ठता, पोट आणि आतड्यांमधील घाण स्वच्छ करण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत. हे घरगुती उपाय करून तुम्ही तात्काळ आराम मिळवू शकता. चला तर जाणून घेऊया.
पोटातील घाण स्वच्छ होण्यासाठी सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी कोमट पाण्यात लिंबू टाकून प्यावे. यामुळे पोट आणि आतड्यांमधील घाण स्वच्छ होईल आणि तुम्हाला आराम मिळेल. लिंबामध्ये आढळून येणारे सायट्रिक ऍसिड आतड्या स्वच्छ करण्यासाठी मदत करतात. तसेच शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जातात. आतड्यांच्या निरोगी आरोग्यासाठी नियमित कोमट पाण्यात लिंबू टाकून प्यावे.
रोजच्या आहारात फायबर युक्त अन्नपदार्थांचे नियमित सेवन करावे. यामध्ये फळे, धान्य, पालेभाज्या, फळभाज्या, सुकामेवा इत्यादी पदार्थांचे सेवन करावे. याशिवाय सफरचंद, केळी, पेरू आणि पालक इत्यादी पदार्थांचे नियमित सेवन केल्यास पचनसंबंधित समस्या कधीच उद्भवणार नाही. फायबरयुक्त अन्नपदार्थ आतड्यांचे कार्य सुरळीत ठेवण्यासाठी मदत करतात.
पोटातून सतत गुरगुरण्याचा आवाज येतो? मग ‘हे’ घरगुती उपाय करून मिळवा आराम, पोटाला मिळेल आराम
शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे नियमित भरपूर पाणी प्यावे. पाणी प्यायल्यामुळे शरीर हायड्रेट राहते आणि ताजेतवाने दिसते. पाण्याचे सेवन केल्यामुळे आतड्या मोकळ्या राहतात आणि पचनसंस्था चांगली राहते. तसेच आहारात नारळ पाणी, सूप, फळांचा रस, हर्बल चहा इत्यादींचे सेवन करावे.