फोटो सौजन्य - Social Media
वजन कमी करण्यासाठी अनेकजण जिमला जातात, सकाळ-संध्याकाळ वॉक करतात, वेगवेगळे डाएट प्लॅन फॉलो करतात आणि काही जण घरगुती उपायही करून पाहतात. पण अनेकांना हवा तशा परिणाम मिळत नाही. हे सगळं टाळून वजन कमी करण्याचा एक नवा ट्रेंड सध्या लोकप्रिय होत आहे, तो म्हणजे इंटरमिटंट फास्टिंग. बॉलिवूडमधील अनेक कलाकारही जिम आणि सर्जरीऐवजी ही पद्धत वापरतात. पण नेमकं हे काय आहे आणि कसं केलं जातं? जाणून घेण्यासाठी हा लेख संपूर्ण नक्की वाचा.
इंटरमिटंट फास्टिंग म्हणजे नक्की काय? जाणून घ्या
इंटरमिटंट फास्टिंग म्हणजे कधी खावे आणि कधी उपवास करावा हे निश्चित करणारी एक पद्धत आहे. यामध्ये खाण्याच्या वेळा आणि उपवासाचे अंतर ठरवले जाते. काही लोक 16 तास काही खात नाहीत तर फक्त 8 तासांसाठी खाणे ही पद्धत वापरतात. तर काही जणं 18 तास उपवास ठेवतात, तर काही लोक आठवड्यात 6 दिवस जेवतात आणि 1 दिवस उपवास करतात. काही जण आठवड्यात 5 दिवस सामान्य आहार घेतात आणि उरलेल्या दोन दिवसांत फक्त फळे आणि द्रवपदार्थ घेतात.
ही पद्धत वजन झपाट्याने कमी करण्यास मदत करते आणि अनेक संशोधनांमध्येही याचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. जेव्हा तुम्ही दीर्घकाळ उपवास करता, तेव्हा शरीरातील साठवलेली चरबी उर्जेसाठी वापरली जाते, ज्यामुळे शरीरातील फॅट कमी होण्यास मदत होते आणि वजन झपाट्याने घटते. तसेच, ही पद्धत हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानली जाते, कारण ती हृदयरोगाचा धोका कमी करते, कोलेस्ट्रॉलचे प्रमाण संतुलित ठेवते आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते. शिवाय, स्ट्रेस हार्मोन्स कमी करून मानसिक आरोग्य सुधारण्यासही मदत होते. पचनसंस्थेच्या दृष्टीनेही इंटरमिटंट फास्टिंग उपयुक्त ठरते, कारण ही पद्धत पचनक्रिया सुधारते, शरीरातील विषारी घटक बाहेर टाकते आणि इंफ्लेमेशन कमी करण्यास मदत करते.
मात्र, इंटरमिटंट फास्टिंग करताना काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागते, कारण ही पद्धत सर्वांसाठी योग्य असेलच असे नाही. योग्य नियोजन आणि मार्गदर्शनाशिवाय ही पद्धत अवलंबल्यास शरीरावर नकारात्मक परिणाम होऊ शकतात. चुकीच्या प्रकारे उपवास केल्यास अशक्तपणा, डोकेदुखी, चक्कर येणे, थकवा जाणवणे, ब्लड प्रेशर कमी होणे यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. विशेषतः डायबिटीस, किडनी विकार, लिव्हरच्या समस्या किंवा कोणत्याही दीर्घकालीन आजाराने त्रस्त असलेल्या लोकांनी तज्ज्ञांचा सल्ला न घेता ही पद्धत अवलंबू नये. काही प्रकरणांमध्ये चुकीच्या प्रकारे फास्टिंग केल्यामुळे पचनासंबंधी समस्या, अन्नातील पोषणतत्त्वांची कमतरता आणि शरीरातील एनर्जी कमी होण्याचा धोका निर्माण होतो. त्यामुळे इंटरमिटंट फास्टिंग करण्याआधी योग्य तज्ज्ञांचा सल्ला घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे, जेणेकरून ही पद्धत सुरक्षित आणि प्रभावी ठरेल.