How To Relieve Stiff Neck Pain Home Remedies Lifestyle News In Marathi
आखडलेल्या मानेचे दुखणे कसे कमी करायचे? डॉक्टर नाही, घरगुती उपाय करतील तुमची मदत
रात्री चुकीच्या स्थितीत झोपल्याने किंवा अयोग्य उशी वापरल्याने सकाळी उठल्यावर मानेत वेदना जाणवतात. मान आखडल्यामुळे हालचाल करणे कठीण होते आणि त्रास वाढतो. अशावेळी काही सोप्या टिप्स वेदना कमी करण्यास मदत करू शकतात.
मानेचे आखडणे सामान्य समस्या असली तरी याची वेदना असहय्य ठरू शकते.
अनेकदा यावर उपाय काय करावा ते सुचत नाही.
काही टिप्सचा वापर करून तुम्ही मानेची आखडणे दूर करू शकता.
रात्री चुकीच्या स्थितीत झोपल्याने किंवा चुकीची उशी वापरल्याने अनेकदा सकाळीउठल्यावर मान दुखते. काही वेळेस मान गोलाकार फिरवणेदेखील कठीण होते. तीव्र वेदनांमुळे मानेचे दुखणे अधिकच त्रासदायक होते. मग अशावेळी नेमके काय करावे ते आपल्याला सुचत नाही. मानेचे आखडणे सामान्य वाटत असले तरी बऱ्याचदा यामुळे तीव्र वेदना होऊ लागतात ज्या आपल्याला सहन होत नाहीत. अशावेळी फिजियोथेरपिस्ट तज्ज्ञांनी दिलेला हा खास सल्ला नक्कीच फायदेशीर ठरेल. चला वेदना कमी करण्यासाठी नक्की काय करावं ते जाणून घेऊया.
मानेच्या ज्या भागावर वेदना जाणवत आहे. ती जागा ओळखून त्यावर हात ठेवा. जर दुखणारी जागा उजव्या बाजूला किंवा पाठीमागच्या बाजूला असेल तर उजवा आणि डाव्या दिशेला असेल तर डावा हात ठेवा. जर तुमचा हात पोहचत नसेल तर टेनिसबॉल सारख्या एखाद्या वस्तूचा वापर करा.
त्या जागेवर हातांच्या बोटांनी विशिष्ट प्रेशरने दावा. सुरवातीला थोड्या प्रमाणात वेदना जाणवतील. मात्र फार जोरात दाबू नका.
दुखणाऱ्या भागाच्या विरुद्ध दिशेने तुमची मान वळवण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर तिरक्या बाजूने डोके झुकवून हाताला हनुवटी चिटकवण्याचा प्रयत्न करा. हळूहळू जखडलेला भाग मोकळा होण्यास आणि वेदना कमी होण्यास सुरवात होईल.
असा प्रकार सतत किमान २० वेळा करण्याचा प्रयत्न करा. मान आणि पाठीच्या वरच्या भागाला स्ट्रेचिंग द्या. असे केल्याने स्नायू हळूहळू मोकळे होण्यास मदत होईल.
मान आखडू नये म्हणून काय करावे?
यासाठी तुम्ही मानेचे व्यायाम करु शकता. जसे की, एका बाजूला कान खांद्याकडे झुकवणे आणि हळूहळू मान एका दिशेला वळवा.
काॅम्प्यूटर किंवा फोन वापरताना मान सरळ ठेवा. चुकीच्या पोश्चरमुळे ‘टेक नेक’ होऊ शकतो.
मानेला उशीचा आधार द्या किंवा उशीशिवाय झोपण्याचा प्रयत्न करा.
जर दुखणे फार तीव्र असेल आणि चार-पाच दिवसांनंतरही तुम्हाला यापासून आराम मिळत नसेल तर अशावेळी थेट रुग्णालय गाठा आणि यावर डाॅक्टरांचा सल्ला घ्या.
जर हातांना मुंग्या येत असतील, अशक्तपणा जाणवत असेल किंवा इतर कोणतीही गंभीर लक्षणे असतील तर यावर डाॅक्टरांशी सल्ला फायद्याचा ठरेल.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
Web Title: How to relieve stiff neck pain home remedies lifestyle news in marathi