आयुर्वेदिक पदार्थांचा वापर करून घरीच बनवा केमिकल फ्री साबण
उन्हाळा वाढल्यानंतर शरीरातून सतत घामाच्या धारा वाहू लागतात. सतत घाम आल्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होऊन अशक्तपणा किंवा थकवा वाटू लागतो. सतत येणाऱ्या घामामुळे काहीवेळा त्वचा अतिशय तेलकट आणि चिकट होऊन जाते. याशिवाय शरीराला घामाची दुर्गंधी येऊ लागते. उन्हाळ्यात घामाचे प्रमाण वाढू लागते. यामुळे काहीवेळा चेहऱ्यावर पिंपल्स, मुरूम किंवा मोठे फोड येऊ लागतात. चेहऱ्यावर आलेल्या मोठ्या फोडांमुळे त्वचेचे सोंदर्य कमी होऊन जाते. त्यामुळे उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये त्वचेची योग्य ती काळजी घ्यावी. स्किन केअर रुटीन फॉलो करत घरगुती उपाय सुद्धा करावे.(फोटो सौजन्य – iStock)
वाढत्या घामाच्या धारांमुळे शरीरावर घाम तसाच साचून राहतो. यामुळे अंगाला सतत खाज येऊ लागते. अंगाला आलेल्या खाजीमुळे बऱ्याचदा पुरळ येऊन त्वचा लाल होऊन जाते. अशावेळी अनेक महिला बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या साबणांचा वापर करतात. मात्र हे साबण काहीवेळा त्वचेसाठी धोक्याचे ठरू शकता. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेला केमिकल फ्री साबण बनवण्याची सोपी कृती सांगणार आहोत. या साबणाचा वापर नियमित अंघोळ करण्यासाठी केल्यास त्वचा कायम फ्रेश आणि स्वच्छ राहील.
कडुलिंबाची पाने संपूर्ण आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहेत. या पानांमध्ये असलेले गुणधर्म शरीरावरील बॅक्टरीया कमी करण्यासाठी मदत करतात. दैनंदिन वापरात कडुलिंबाच्या पानांपासून बनवलेला साबण वापरल्यास शरीरावरील दुर्गंधी कमी होईल आणि तुम्ही कायम फ्रेश आणि आनंदी राहाल. या पानांमध्ये अँटिऑक्सिडंट आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आढळून येतात.
केमिकल फ्री साबण बनवण्यासाठी सर्वप्रथम, कडुलिंबाची पाने पाण्यात स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात कडुलिंबाची पाने आणि बिया टाकून बारीक वाटून घ्या. त्यानंतर त्यात हळद आणि कोरफडचा गर टाकून मिक्स करा. तयार करून घेतलेली पेस्ट वाटीमध्ये काढून त्यात विटामिन ई कॅप्सूल टाकून मिक्स करून घ्या. तयार केलेले बाजूला ठेवा. ग्लिसरीन बेस साबणाचे तुकडे करून वाटीमध्ये घ्या. त्यानंतर गरम पाण्यात साबण पूर्णपणे वितळवून घ्या. त्यानंतर त्यात तयार करून घेतलेले मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्या. 6 ते 7 तास साबण तयार होण्यासाठी लागेल. या पद्धतीने घरी तयार करा केमिकल फ्री साबण. यामुळे घामामुळे खराब झालेली त्वचा अतिशय सुंदर आणि चमकदार होईल.