omaxe mall
देशात अनेक फूडप्रेमी आहेत ज्यांना नवनवीन प्रकारचे फूड्स ट्राय करायला फार आवडतात. खाऊगल्ली हा फूड लव्हर्सच्या आवडीचा विषय, कारण इथे एकाच ठिकाणी आपल्याला अनेक वेगवेगळ्या प्रकारचे फूड कोर्ट पाहायला मिळतात. ज्यामुळे आपण सरबतपासून ते जेवणापर्यंत अनेक गोष्टींचा आस्वाद घेऊ शकतो. खाद्यप्रेमी नेहमीच खाण्याच्या नवनवीन ठिकाणांच्या शोधात असतात अशात आज आम्ही तुम्हाला दिल्लीतील अशा एक मॉलविषयी माहिती सांगणार आहोत जिथे देशातील सर्वात मोठा फूड कोर्ट पाहायला मिळतील. इथे जाताच तुम्हाला फूड स्टॅल्सच्या रांगाच रांगा पाहायला मिळतील. इथे तुम्हाला खाण्याचे अगणित प्रकार पाहायला मिळतील, जे पाहूनच तुमचं पोट भरेल पण मन भरणार नाही.
आम्ही तुम्हाला सांगतो की, हे मॉल जुन्या दिल्लीत आहे. आता दिल्ली म्हटलं की, खाद्यपदार्थांचा विषय हा येणारच! चाट, कबाब, सरबतपासून मोमोज आणि कुल्फीपर्यंत दिल्लीमध्ये अनेक चविष्ट पदार्थांचा आस्वाद घेता येतो. आम्ही जुन्या दिल्लीतील ओमॅक्स मॉलबद्दल सांगत आहोत जिथे भारतातील सर्वात मोठा फूड कोर्ट आहे. इथे खाण्याचे इतके प्रकार आहेत की ते मोजून तुम्हाला कंटाळा येईल पण चवीबद्दल बोलणे केले तर पदार्थांची चव आयुष्यभर तुमच्या स्मरणात राहिल. चला यातीलच काही फेमस फूड स्टाॅल्सविषयी जाणून घेऊयात.
टुंडे कबाबी
मुघलाई खाद्यपदार्थांमध्ये टुंडे कबाबी एक लोकप्रिय पदार्थ आहे. त्याची सर्वात मोठी ओळख म्हणजे त्याचा गलोटी कबाब, जो इतका मऊ आहे की तो तोंडात टाकताच विरघळू लागतो. लखनौच्या नवाबी स्वयंपाकघरातील पाककृती , विशेष मसाले आणि पारंपारिक पद्धतीने तयार केलेला प्रत्येक पदार्थ चव आणि सुगंधाचा एक अद्भुत संगम आहे. ओमॅक्स मॉलमध्ये तुम्हाला हे चविष्ट टुंडे कबाबी पाहायला मिळतील. मुख्य म्हणजे याची चव लखनौच्या कबाब्सना तोडीस तोड देते.
कुरेमल कुल्फी
शतकाहून अधिक काळाचा वारसा पुढे नेणारे नाव, कुरेमल मोहन लाल कुल्फीवाला आता ओमॅक्स चौकातही आढळू शकते. इथे कुल्फी फक्त चावीलाच अप्रतिम लागत नाही तर त्याचा पोत, शुद्धता आणि सादरीकरणही याला आणखीन खास बनवते. फ्रुट कुल्फी, मलाई कुल्फी, आंबा कुल्फी असे कुल्फीचे विविध प्रकार तुम्हाला इथे पाहायला मिळतील.
गया प्रसाद पराठेवाले
हे आउटलेट जुन्या दिल्लीच्या पराठ्यांच्या गल्लीला उजाळा देते. देशी तुपात तळलेले आणि मसालेदार स्टफिंगने भरपूर हे पराठे मनाला मंत्रमुग्ध करून जातात. पिढ्यानपिढ्या चालणारे हे दुकान आता ओमॅक्स चौकात त्याच्या त्याच मूळ चवीसह उपलब्ध आहे.इथे तुम्हाला बटाटा, कोबी, पनीर तसेच खजुराचाही पराठा पाहायला मिळेल. याची अद्वितीय चव दिल्लीच्या खाऊगल्लीची आठवण करून देते.
मेहफिल
जर तुम्हाला फक्त पोट भरण्यासाठीच नाही तर एका सुंदर अनुभवासाठीही कुठे जायचे असेल, तर ‘मेहफिल’ फूड कोर्ट तुमच्यासाठीच आहे. हे ठिकाण उत्तर भारतीय चवींसह सांस्कृतिक वातावरण देते, ज्यामध्ये लाईव्ह म्युजिक आणि कौटुंबिक वातावरण पाहायला मिळते. तुम्ही सण, फॅमिली डिनर किंवा मित्रांसोबत एक संस्मरणीय संध्याकाळ घालवण्यासाठी याला भेट देऊ शकता.
आजही या पर्वतांवर आहे देवांचा वास; भक्तांना होते त्यांच्या उपस्थितीची जाणीव
ताज शरबत
शुद्ध देशी चव आणि ताजेपणाने परिपूर्ण, ताज शरबत हे एक असे नाव आहे जे अजूनही दिल्लीच्या जुन्या शीतपेयांची परंपरा जिवंत ठेवत आहे. गुलाब, लिंबू, केशर, गोड आणि आंबट अशा चवींमध्ये उपलब्ध असलेले हे शरबत उन्हाळ्यात तुम्हाला कोणत्या अमृताहून कमी वाटणार नाही.