अपुऱ्या झोपेमुळे महिलांच्या हार्मोन्स आणि ओव्ह्युलेशनवर होतो गंभीर परिणाम; जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेला धक्कादायक इशारा
हल्लीच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे अनेकजण झोपेच्या वेळापत्रकाचे पालन करत नाहीत. पुरेशी झोप न झाल्यास त्याचा परिणाम शरीरातील हार्मोन्सच्या संतुलनावर होऊ शकतो तसेच महिलांमध्ये ओव्ह्युलेशन प्रक्रियेवरही त्याचा दुष्परिणाम होतो.डॉ. बुशरा खान(फर्टिलिटी स्पेशालिस्ट, नोवा आयव्हीएफ फर्टिलिटी, खराडी, पुणे) सांगतात की, झोप ही शरीरासाठी अंतर्गत दुरुस्ती आणि हार्मोन्सचे संतुलन राखण्यासाठी महत्त्वाची प्रक्रिया आहे. विशेषतः महिलांमध्ये मासिक पाळी आणि ओव्ह्युलेशन नियंत्रित करणारे हार्मोन्स शरीराच्या सर्केडियन रिदमशी जोडलेले असतात. रात्री उशिरापर्यंत जागरण, कामाचा वाढता ताण, वाढता स्क्रीनचा टाईम किंवा अनियमित झोपेचे वेळापत्रक यामुळे हार्मोन्सचे संतुलन बिघडू शकते. त्यामुळे ओव्ह्युलेशन उशिरा होणे, मासिक पाळी अनियमित होणे किंवा गर्भधारणेत अडचणी येऊ शकतात.(फोटो सौजन्य – istock)
डॉ. खान यांच्या मते, शरीरात २४ तास चालणारी सर्केडियन रिदम ही नैसर्गिक प्रक्रिया आपली झोप आणि हार्मोन्सची निर्मिती नियंत्रित करते. झोपेत मेलाटोनिन हा हार्मोन तयार होतो, जो झोपेचे चक्र नियंत्रित करतो आणि स्त्रीबीजाच्या गुणवत्तेचे संरक्षण करण्यात मदत करतो. झोप कमी झाल्यास मेलाटोनिनचे प्रमाण घटू शकते. तसेच इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन आणि ल्युटिनायझिंग हार्मोन (LH) हे ओव्ह्युलेशनसाठी महत्त्वाचे हार्मोन्स झोपेच्या अभावामुळे असंतुलित होऊ शकतात.याशिवाय झोप कमी झाल्यास कॉर्टिसोलसारखा तणाव वाढवणारा हार्मोनचे प्रमाण वाढते, ज्यामुळे प्रजननाशी संबंधित हार्मोन्सवर परिणाम होऊ शकतो. विशेषतः रात्री उशिरापर्यंत जागणाऱ्या किंवा नाईट शिफ्ट करणाऱ्या महिलांमध्ये हार्मोनल असंतुलनाची समस्या अधिक दिसून येते.
महिलांनी दररोज किमान ७–८ तासांची चांगली झोप घेणे गरजेचे असून झोपण्यापूर्वी स्क्रीनचा टाईम कमी करणे, योग-ध्यान करणे आणि नियमित झोपेची सवय लावणे फायदेशीर ठरते, असा सल्लाही त्यांनी दिला.डॉ. पद्मा श्रीवास्तव( वरिष्ठ स्त्रीरोग तज्ज्ञ, मदरहूड हॉस्पिटल्स, लुल्लानगर, पुणे) यांनी सांगितले की, सध्याच्या तणावपूर्ण जीवनशैलीमुळे अनेक महिलांना झोपेचा अभाव जाणवतो. त्यामुळे हार्मोन्सचे संतुलन बिघडून मासिक पाळी अनियमित होणे, मूड स्विंग, थकवा आणि ओव्ह्युलेशनमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात.त्या पुढे सांगतात की, २५ ते ३७ वयोगटातील १० पैकी सुमारे ६ महिला या अनियमित झोप, थकवा, मूड स्विंग्ज आणि पाळीच्या तक्रारींसह उपचारासाठी येतात आणि काहींमध्ये पीसीओएसचा धोका देखील दिसतो.
तोंडातील जखमेकडे दुर्लक्ष नको; ‘ही’ आहेत Head Neck Cancer ची सुरुवातीची लक्षणे
महिलांनी नियमित झोप, संतुलित आहार, व्यायाम, तणाव कमी करण्याच्या पद्धती आणि वेळीच वैद्यकीय सल्ला घेतल्यास हार्मोन्स संतुलित राहण्यास मदत होते आणि ओव्ह्युलेशन प्रक्रिया सुरळीत होते व प्रजनन आरोग्य देखील चांगले राहते असे तज्ज्ञांनी स्पष्ट केले.






