आपलं निरोगी आरोग्य हे फक्त चांगल्या आहारवरच नाही तर जेवणाच्या, नाश्ताच्या एवढंच नाही तर झोपण्य़ा उठण्याच्य़ा वेळांवर देखील अवलंबून आहे. अनियमित अवेळी जेवणं, उपाशी राहणं किंवा रात्री उशिरा मासालेदार चमचमीत खाणं यामुळे पोटात आम्ल (अॅसिड) जास्त प्रमाणात तयार होते. हे आम्ल अन्ननलिकेत गेलं की छातीत जळजळ, ढेकर, उलट्या, पोटदुखी अशी लक्षणं दिसतात. तसेच तिखट, तेलकट, मसालेदार पदार्थ, जास्त कॉफी किंवा चहा, सॉफ्ट ड्रिंक्स यांचा वापरही अॅसिडीटी वाढवतो. धूम्रपान आणि मद्यपान हे आणखी घातक कारण ठरतात.
ऑफिस कल्चरमधील बसून होत असलेल्या कामामुळे शारीरिक हालचाल कमी होते त्यामुळे शरीराची पचनशक्ती मंदावते. सतत बसून काम करणं, व्यायामाचा अभाव, तसेच दिवसभर संगणकासमोर बसून राहणे या सवयींमुळे शरीरातील चयापचय प्रक्रिया मंदावते आणि अॅसिडीटी वाढते. मानसिक ताणही एक मोठा घटक आहे. ताणतणाव वाढला की मेंदूतील हार्मोन्स आम्ल हा घटक वाढवतात आणि त्यामुळे पोटात जळजळ होते.






