पावसात केस सतत भिजून कोरडे आणि रुक्ष झाले आहेत?
राज्यासह संपूर्ण देशभरात सगळीकडे मुसळधार पाऊस पडत आहेत. सतत पावसात भिजल्यामुळे आरोग्य बिघडते. सर्दी, खोकला इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागल्यानंतर शरीराला हानी पोहचते. शरीरासोबतच केसांचे सुद्धा आरोग्य बिघडण्याची जास्त शक्यता असते. सतत पावसात भिजल्यानंतर केस अतिशय रुक्ष आणि कोरडे वाटू लागतात. कितीही स्वच्छ केले तरीसुद्धा केसांची गुणवत्ता सुधारली जात नाही. कोरडे झालेले केस पुन्हा एकदा मुलायम आणि सुंदर करण्यासाठी महिला बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या हेअर केअर प्रॉडक्टचा वापर करतात. कधी हेअर स्पा केला जातो तर कधी हेअर मास्क लावून केसांची काळजी घेतली जाते. पण सतत केमिकल युक्त हेअर केअर प्रॉडक्ट वापरल्यामुळे केसांची गुणवत्ता आणखीनच खराब होऊन जाते. केसांची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी केमिकल आणि घरगुती असे दोन्ही उपाय केले जातात.(फोटो सौजन्य – istock)
केसांना वेगवेगळ्या पदार्थांपासून बनवलेला हेअर मास्क लावला जातो. तर कधी दही, अंड किंवा लोणी लावून केस मऊ केले जातात. मात्र यामुळे केस आणखीनच चिकट आणि तेलकट होतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला केसांची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी कोणते टिप्स फॉलो कराव्यात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या टिप्स फॉलो केल्यामुळे केसांची गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल आणि केस आणखीनच सुंदर, उठावदार दिसू लागतील.
केस कायमच निरोगी आणि चमकदार ठेवण्यासाठी केसांना वरून पोषण देण्याऐवजी आतून पोषण देणे जास्त आवश्यक आहे. आहारात वेगवेगळ्या हेल्दी पदार्थांचे सेवन केल्यामुळे केसांची मूळ मजबूत होतात आणि केस चमकदार, सुंदर दिसतात. केसांची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या पदार्थांचा वापर करावा. याशिवाय केस स्वच्छ करताना गरम पाण्याचा अजिबात वापर करू नये. यामुळे केस आणखीनच कोरडे होण्याची शक्यता असते.
ओल्या केसांवर कधीही फणी फिरवू नये. यामुळे केस मुळांपासून तुटण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे केस पूर्णपणे कोरडे झाल्यानंतरच विंचरावे. केस विंचरण्यासाठी लाकडाच्या कंगव्याचा वापर करावा. प्लॅस्टिकच्या फणीचा वापर अजिबात करू नये. यामुळे केसांच्या मुळांना इजा होते. गुंतलेले केस सोडवण्यासाठी बोटांचा वापर करावा.
वाटीमध्ये लिंबाचा रस आणि कोमट पाणी टाकून मिक्स करून घ्यावे. तयार केलेले मिश्रण कापसाच्या किंवा हातांच्या सहाय्याने संपूर्ण केसांच्या मुळांपासून ते टोकांपर्यंत सगळीकडे लावून घ्या. त्यानंतर ३० मिनिट केसांवर लावलेले मिश्रण तसेच ठेवून घ्या आणि नंतर पाण्याने केस स्वच्छ धुवून टाका. यामुळे केसांमध्ये चिटकून राहिलेली घाण स्वच्छ होते.
पूर्वीच्या काळी महिला केसांसंबधित समस्या उद्भवू लागल्यानंतर शिकेकाईचा वापर करत असे. शिकेकाई केसांच्या मुळांना पोषण देते. शिकेकाई पावडर वाटीमध्ये घेऊन त्यात पाणी घालून मिक्स करून घ्या. तयार केलेले मिश्रण रात्रभर तसेच झाकून ठेवा. त्यानतंर सकाळी व्यवस्थित मिक्स करून केसांच्या मुळांपासून ते अगदी टोकापर्यंत सगळीकडे लावून ठेवा. ३० मिनिटं झाल्यानंतर केस पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.