डोळ्यांना विकतचे हानिकारक Kajal आणून लावण्यापेक्षा दिव्यातील वातींचा वापर करून पारंपरिक पद्धतीने घरीच बनवा काजळ
डोळ्यांचे सौंदर्य आणखीनच उठावदार आणि सुंदर करण्यासाठी महिला एयशॅडो, मस्कारा, आयलायनर आणि काजळ लावतात. यामुळे डोळे अतिशय उठावदार दिसतात. लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं काजळ लावले जाते. काजळ लावल्यामुळे डोळे खूप जास्त रेखीव दिसतात. बाजारात अनेक वेगवेगळ्या ब्रँडचे काजळ उपलब्ध आहेत. हे काजळ बनवताना वेगवेगळ्या केमिकल रसायनांचा वापर केला जातो. केमिकलयुक्त प्रॉडक्ट वापरल्यामुळे डोळ्यांना इजा होण्याची जास्त शक्यता असते. डोळे लाल होणे किंवा डोळ्यांमधून सतत पाणी येऊ लागते. काजळ लावल्यानंतर डोळ्यांमधून वारंवार पाणी येत असेल तर काजळ लावणे टाळावे. यामुळे डोळे आणखीनच खराब होऊ शकता.(फोटो सौजन्य: Pinterest)
सर्वच घरांमध्ये गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. गणपती बाप्पाचे आगमन झाल्यानंतर घरात पूजा – आरती करताना निरांजन लावले जाते. निरंजनमधील वाती संपल्यानंतर फेकून दिल्या जातात. पण या वाती फेकून देण्याऐवजी त्यांच्यापासून तुम्ही होममेड काजळ तयार करू शकता. पारंपरिक पद्धतीचा वापर करून बनवलेले काजळ डोळ्यांना कोणतीही हानी पोहचवत नाही. केमिकल्सयुक्त व आर्टिफिशियल रंगाचा वापर करून बनवलेले काजळ न वापरता घरगुती पद्धतीने बनवलेले काजळ लावावे. जाणून घ्या होममेड काजळ बनवण्याची सोपी कृती.
काजळ तयार करताना सर्वप्रथम, पूजेमध्ये जळलेल्या वाती वाटीमध्ये एकत्र करून घ्या. त्यानंतर त्यात तूप किंवा खोबऱ्याचे तेल टाकून त्या वाती पुन्हा एकदा पेटवून त्यावर झाकण ठेवा. काहीवेळ झाकण दिव्यावर तसेच ठेवून द्या. हळूहळू झाकणावर काजळी जमा होण्यास सुरुवात होईल. वाती पूर्णपणे जळल्यानंतर त्यातील धुरामुळे काजळी तयार होण्यास सुरुवात होईल. दिवा थंड झाल्यानंतर झाकणावर साचलेला काळा थर वाटीमध्ये काढून घ्या. त्यानंतर त्यात खोबऱ्याचे तेल किंवा तूप टाकून व्यवस्थित मिक्स करा आणि घट्ट झाकणाच्या डबीमध्ये भरून ठेवा. तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले होममेड काजळ.
नैसर्गिक घटक आणि पारंपरिक पद्धतीचा वापर करून बनवलेले काजळ डोळ्यांना कोणतीही हानी पोहचवत नाही. यामध्ये कोणत्याही प्रकारच्या रासायनिक द्रव्याचा किंवा पदार्थांचा वापर केला जात नाही. यामुळे डोळे निरोगी राहतात.
काजळ तयार करताना तुपाचा वापर करावा. तुपाच्या वापरामुळे डोळ्यांमधील कोरडेपणा कमी होतो आणि डोळे कायमच हायड्रेट राहतात. पारंपरिक पद्धतीने बनवले काजळ जास्त वेळ व्यवस्थित टिकून राहते.