पावसाळ्यातील केसांच्या बाबतीतील गैरसमज (फोटो सौजन्य - iStock)
पावसाच्या पाण्यामुळे केस गळतात, असा अनेकांचा गैरसमज आहे. या ऋतुमानातील केसगळती ही प्रामुख्याने हवेतील आर्द्रतेतील बदल, टाळूचे असंतुलन, केसांमध्ये साचणारे प्रॉडक्ट्स यांमुळे होते. अचानक होणा-या या बदलांमुळे टाळूवर विपरित परिणाम होऊन केस गळतात. या बदलांमुळे काही काळासाठी केस गळण्याचे प्रमाण वाढण्याचीही भीती असते. पावसाळ्यात केसगळतीकरिता खालील गैरसमज टाळा
पावसाच्या पाण्यामुळे केस गळतात
पावसाचे पाणी केस गळण्यासाठी कारणीभूत असल्याचे अनेकांचे मत आहे. मात्र हे खरे नाही. पावसाळ्यात वाढलेली आर्द्रता, टाळूचे बिघडलेले संतुलन आणि केसांवर साचलेली उत्पादनांची पुटे यांमुळे केस गळण्याचे प्रमाण वाढू शकते. हवामान बदलांमुळे केसांवरील टाळू पटकन प्रभावित होतो. या बदलांचा टाळूवर परिणाम दिसून येतो. त्यामुळे काही काळासाठी केस जास्त गळतात.
वारंवार केस धुणे
पावसाळ्यात केस धुणे टाळल्यास त्याचा विपरित परिणाम होतो. दमट हवामानामुळे केसांमध्ये घाम, तेल आणि प्रदूषणाचा थर साचतो. केस व्यवस्थित न धूतल्यास, टाळूचे आरोग्य बिघडते. कोंडा, खाज किंवा इतर समस्या निर्माण होऊ शकतात. सौम्य शॅम्पूचा नियमितपणे वापर करा.
नियमित तेल लावणे
पावसाळ्यात सतत तेल लावल्याने केस सुरक्षित राहतात, असा अनेकांचा गैरसमज आहे. प्रत्यक्षात सतत जास्त प्रमाणात तेल लावल्याने केस जड होतात. टाळूवरील छिद्रे बंद होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे टाळूचे नैसर्गिक संतुलन बिघडू शकते. म्हणून तेलाचा मर्यादित वापर करणे योग्य ठरते.
विस्कळीत केसांना खराब केस समजणे
पावसाळ्यात हवेतील आर्द्रतेमुळे केसांमध्ये ओलावा शोषला जातो. त्यामुळे केस विस्कळीत होतात किंवा कोरडे दिसू लागतात. यामुळे केस खराब होत नाहीत. या दिवसांत केसांचा वरचा भाग फुगतो. केस पुन्हा विंचरल्यास विस्कळीत झालेले केस नियंत्रणात येतात.
सर्व प्रकारच्या केसांसाठी हेअर केअर रुटीन न बदलणे
केसांची काळजी घेण्याची एकच पद्धत सर्व प्रकारच्या केसांना लागू पडत नाही. सरळ, कुरळे किंवा रंग लावलेले केस हे आर्द्रतेला वेगवेगळ्या पद्धतीने प्रतिसाद देतात. पावसाळ्यात केसांमध्ये साचणा-या घाणीचे प्रमाणही वेगवेगळ्या केसांवर वेगवेगळे असते. त्यामुळे या ऋतूत स्वतःच्या केसांच्या प्रकारानुसार योग्य काळजी घेणे गरजेचे आहे.
जास्त उत्पादनांच्या वापराने केसांना संरक्षण मिळते
एकाच वेळी केसांवर अनेक उत्पादनांचा भडिमार करणे योग्य नाही. अनेक उत्पादनांचा वापर केल्याने केसांवर थर साचतो. केसांना त्यांच्या रचनेनुसार तसेच समस्येनुसार योग्य उत्पादनांची गरज असते. या दिवसात विस्कटलेले केस नियंत्रणात आणणारी, टाळूचे संतुलन राखण्यास मदत करणारी तसेच केसांमध्ये ओलावा टिकवून ठेवणारी उत्पादने वापरायला हवीत. प्रो बायो हनी मॉश्चर शॅम्पूसारखी उत्पादने केसांच्या गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आली असून, या उत्पादनाच्या वापराने इतर अनावश्यक उत्पादनांचा वापर टाळता येतो.
पावसाळ्यामध्ये केसांची निगा राखणे म्हणजे पावसाळ्याशी लढा देणे नव्हे. या ऋतुमानांत केसांच्या बदलत्या गरजा समजून घेणे महत्त्वाचे आहे. केसांबाबतचे गैरसमज दूर केल्यास त्यांची निगा राखण्याची पद्धत सोपी होते. ही पद्धत प्रभावीरित्या उपयुक्त ठरते. केसांची निगा राखण्यासाठी सतत प्रयत्न करण्यापेक्षा योग्य माहितीच्या आधारांवर परिणामकारक पद्धतींचा अवलंब करावा.






