पिंपल्स मुरुमांचे डाग होतील कायमचे नष्ट! संत्र्याच्या सालीचा 'या' पद्धतीने करा वापर
सर्वच महिलांना कायमच सुंदर आणि चमकदार त्वचा हवी असते. चेहऱ्यावरील ग्लो वाढवण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. स्किन केअर प्रॉडक्टचा वापर केला जातो तर कधी बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या स्किन केअर आणि क्रीमचा वापर करून त्वचेची काळजी घेतली जाते. पण सतत केमिकल उत्पादनांच्या वापरामुळे त्वचा खूप जास्त निस्तेज होऊन चेहऱ्यावरील तेज कमी होते. बिघडलेल्या पचनक्रियेचा परिणाम चेहऱ्यावर लगेच दिसून येतो. मोठे मोठे पिंपल्स, मुरूम, फोड किंवा त्वचेच्या इतरही समस्या उद्भवू लागतात. त्वचेच्या समस्या वाढू लागल्यानंतर त्यांच्याकडे दुर्लक्ष करता वेळीच उपचार करणे आवश्यक आहे. चेहऱ्यावर पिंपल्स आल्यानंतर काही दिवसांमध्ये पिंपल्स निघून जातात, पण पिंपल्सचे काळे डाग तसेच चेहऱ्यावर दिसतात. पिंपल्सचे काळे डाग लवकर निघून जात नाही. (फोटो सौजन्य – istock)
त्वचेची गुणवत्ता खराब झाल्यानंतर कायमच केमिकल ट्रीटमेंट किंवा बाजारातील स्किन केअरचा वापर करण्याऐवजी घरगुती उपाय करावेत. घरगुती उपाय केल्यामुळे चेहऱ्यावरील तारुण्य दीर्घकाळ व्यवस्थित टिकून राहते. याशिवाय त्वचेमधील ओलावा कमी होत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला संत्र्याच्या सालीचा वापर करून फेसपॅक बनवण्याची सोपी कृती सांगणार आहोत. संत्र्याच्या सालीचा फेसपॅक चेहऱ्यावर लावल्यास त्वचा उजळदार आणि सुंदर दिसेल. याशिवाय त्वचेच्या समस्या उद्भवणार नाहीत.
संत्र्याच्या सालीचा फेसपॅक बनवण्यासाठी सर्वप्रथम, संत्र्याच्या साली कडक उन्हात वाळवून घ्या. त्यानंतर सुकलेल्या सालींची पावडर तयार करून घ्या. तयार केलेली पावडर वाटीमध्ये घेऊन त्यात मसूर डाळीची पावडर, तांदळाचे पीठ, बेसन आणि गुलाब पाणी घालून पेस्ट तयार करा. तयार केलेली पेस्ट जास्त पातळ किंवा घट्ट करू नये. सगळ्यात शेवटी फेसपॅकमध्ये कोरफड जेल घालून व्यवस्थित मिक्स करा. फेसपॅक तयार केल्यानंतर तो लावण्याआधी त्वचा पाण्याने स्वच्छ धुवून कोरडी करून घ्या. त्यानंतर संपूर्ण चेहऱ्यावर आणि मानेवर फेसपॅक लावून काहीवेळ तसाच ठेवा. १५ ते २० मिनिटं झाल्यानंतर त्वचा पाण्याने स्वच्छ धुवून टाका.
संत्र्याच्या सालीचा फेसपॅक आठवड्यातून एकदा किंवा नियमित सुद्धा लावू शकता. यामुळे चेहऱ्यावरील काळेपणा कमी होईल आणि त्वचा सुंदर दिसेल. संत्र्याच्या सालीमध्ये विटामिन सी आणि इतर अनेक घटक मोठ्या प्रमाणावर आढळून येतात, ज्यामुळे त्वचा हायड्रेट आणि सुंदर राहते. थंडीच्या दिवसांमध्ये शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी संत्र्याचे सेवन करावे.






