प्रिमॅच्युअर ओव्हरीयन फेल्युअरची वाढती समस्या (फोटो सौजन्य - iStock)
सामान्यतः हा वयोगट उत्तम प्रजननक्षमत असलेला वयोगट म्हणून ओळखला जातो. मात्र बदलती जीवनशैली, वाढता ताणतणाव आणि काही अंतर्गत वैद्यकीय कारणांमुळे अंडाशयांच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.प्रिमॅच्युअर ओव्हेरियन फेल्युअर (POF), ज्याला अर्ली ओव्हेरियन इन्सफिशियन्सी असेही म्हटले जाते, ही अशी स्थिती आहे ज्यात ४० वर्षांपूर्वीच अंडाशयाचे कार्य कमी होते किंवा थांबते. यामुळे अंड्यांची निर्मिती कमी होते किंवा थांबते आणि इस्ट्रोजेन हार्मोनची पातळी घटते. याचा परिणाम प्रजननक्षमतेवर तसेच संपूर्ण हार्मोनल संतुलनावर होतो. नैसर्गिक मेनोपॉजपेक्षा ही स्थिती वेगळी असली तरी गर्भधारणेवर याचा मोठा परिणाम होतो.
काय आहेत कारणं
या आजारामागील कारणांमध्ये आनुवंशिकता किंवा कौटुंबिक इतिहास, ऑटोइम्यून विकार (ज्यात शरीर स्वतःच्या अंडाशयांवर हल्ला करते), आहाराच्या चुकीच्या सवयी, व्यायामाचा अभाव, धूम्रपान, वाढलेला ताणतणाव, अनियमित झोप, पर्यावरणीय घटक, विषारी पदार्थांचा संपर्क तसेच केमोथेरपी किंवा रेडिएशनसारखे उपचार यांचा समावेश होतो.प्रिमॅच्युअर ओव्हेरियन फेल्युअर (POF) आजाराच्या लक्षणांमध्ये मासिक पाळी अनियमित होणे किंवा बंद होणे, गर्भधारणेत अडचणी येणे, हॉट फ्लॅशेस व रात्री घाम येणे, मूड स्विंग्ज व चिडचिड, योनी मार्गाचा कोरडेपणा आणि लैंगिक इच्छेत घट.
बाळाला जन्म देण्यासाठी पुरुषांचा Sperm Count किती पाहिजे, कशी करावी तपासणी
काय सांगतात तज्ज्ञ
गेल्या काही महिन्यांत आम्ही विशेषतः २५ ते २६ वयोगटातील ३ ते ४ तरुण महिलांमध्ये प्रिमॅच्युअर ओव्हेरियन फेल्युअरच्या लक्षणांचे निदान करत आहोत. पूर्वी या वयोगटात अशी प्रकरणं अपेक्षित नव्हती असे मत वंध्यत्व निवारण तज्ज्ञ डॉ. रश्मी निफाडकर, नोवा आयव्हीएफ फर्टिलिटी, बाणेर, पुणे यांनी व्यक्त केले.
त्या पुढे म्हणाल्या, हा आजार मानसिकदृष्ट्याही तणावास कारणीभूत ठरतो, विशेषतः ज्या महिलांना कुटुंब नियोजन करायचे आहे त्यांना यामुळे तणावाचा सामना करावा लागतो. वेळीच निदान करणे अत्यंत गरजेचे असून हार्मोन तपासण्या, विशेषतः एएमएच टेस्ट, तसेच सोनोग्राफीद्वारे अंडाशयांची क्षमता तपासता येते. बऱ्याचदा नैसर्गिक गर्भधारणा अवघड असू शकते, मात्र वेळीच निदान झाल्यास एग फ्रीझिंग, डोनर एगसह आयव्हीएफ आणि हार्मोन थेरपी यांसारखे पर्याय उपलब्ध आहेत. मासिक पाळीत अनियमितता किंवा इतर लक्षणे दिसल्यास उपचारास विलंब करू नये.
पुरुषांनो! आयुर्वेदिक विधीने वाढू शकते लैंगिक क्षमता आणि Fertility, तज्ज्ञांनी दिला योग्य सल्ला
प्रिमॅच्युअर ओव्हरीयन फेल्युअर म्हणजे नेमके काय?
प्रिमॅच्युअर ओव्हरीयन फेल्युअर (POF) हा केवळ प्रजननक्षमतेपुरता मर्यादित नसून तो हार्मोनल आरोग्यावर परिणाम करतो. इस्ट्रोजेनची कमी पातळी हाडे, हृदय आणि मानसिक आरोग्यावरही परिणाम करू शकते. अनेक तरुण महिला अनियमित मासिक पाळीकडे दुर्लक्ष करतात किंवा त्याला फक्त ताणतणावाचे कारण मानतात.
मात्र सतत अशी लक्षणे दिसत असल्यास त्याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. आम्हाला दर महिन्याला १ ते २ प्रकरणं आढळतात आणि आम्ही योग्य हार्मोनल सपोर्ट, ताणतणाव नियंत्रण, संतुलित आहार, व्यायाम आणि नियमित तपासणीचा सल्ला देतो. प्रिमॅच्युअर ओव्हेरियन फेल्युअर (POF) असतानाही महिला निरोगी आणि समाधानी जीवन जगू शकतात, असे मत स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सुजाता उदय राजपूत, मदरहुड हॉस्पिटल्स, लुल्लानगर, पुणे यांनी व्यक्त केले.
तज्ज्ञांच्या मते, तरुण महिलांमध्ये वाढणारी ही समस्या एक धोक्याची घंटा असून विशीतील तरुणींनीही प्रजनन आरोग्याकडे विशेष लक्ष देण गरजेचे आहे . याबाबत पुरेशी जागरूकता, वेळीच निदान आणि उपचारांच्या मदतीने या स्थितीवर नियंत्रण ठेवता येते आणि तुमचे आरोग्य जपण्यासाठी मदत होते.






