आदिशक्ती मालिकेतील शिवाने शेअर केला फिटनेस फंडा!
प्रत्येक व्यक्तीला अभिनेत्यांप्रमाणे उत्तम आणि निरोगी शरीरयष्टी हवी असते. निरोगी आरोग्यासाठी सतत काहींना काही केले जाते. आहारात होणारे बदल, जिम, भरपुर पाणी इत्यादी जीवनशैली योग्य पद्धतीने फॉलो केल्यास निरोगी आरोग्याचा समतोल राखता येतो. ‘सन मराठी’ वरील ‘आदिशक्ती’ मालिकेतील शिवाची भूमिका साकारणारा अभिनेता अतुल आगलावे सोशल मीडियावर चांगलाच प्रसिद्ध झाला आहे.या भूमिकेसाठी प्रचंड मेहनत घेतली असून त्याला फिटनेसचं खूप वेड आहे. नुकतंच अतुलने त्याचा फिटनेस फंडा चाहत्यांसह शेअर केला आहे.(फोटो सौजन्य – iStock)
थुलथुलीत लटकलेले पोट सपाट करण्याचा जबरदस्त उपाय, 21 दिवसात फायदा 3 आजार होतील छुमंतर
फिटनेस बद्दल सांगताना अतुल म्हणाला की, ” सध्या आदिशक्ती या मालिकेत मी शिवा ही भूमिका साकारत आहे. उत्तम शरीरयष्टी असणं या भूमिकेची गरज होती. पण मला स्वतःला फिट ठेवण्याचे वेड आहे. या बद्दल सांगायचं झालं तर, मी दहावी झाल्यावर ठरवलं की आता स्वतःकडे लक्ष द्यायचं. मग मी घरातच व्यायाम सुरू केला. माझ्या मामामुळे मला व्यायामाची आवड निर्माण झाली. ते स्वतः फिट आहेत आणि त्यांच्या सवयी पाहून मला ही प्रेरणा मिळाली. सुरुवातीला डायट म्हणजे काय, हे मला माहितीच नव्हतं. गोड खूप आवडायचं, त्यामुळे भूक लागली की मी काहीही खायचो. त्यामुळे थोड्या काळात वजन वाढलं. तेव्हा लक्षात आलं की फक्त व्यायाम करून चालत नाही, खाण्यावरही तितकंच लक्ष द्यायला हवं.नंतर मी जिम जॉइन केली. तिथे गेल्यानंतर खूप काही शिकायला मिळालं. डायट, योग्य व्यायाम, आणि शिस्त. जिम सुरू करताना माझं वजन होतं 82 किलो. मेहनत घेतली, योग्य खाल्लं, आणि फक्त ४ महिन्यांत १८ किलो वजन कमी केलं. तेव्हापासून आजपर्यंत माझं वजन 64 किलोच आहे.”
पुढे बोलताना अतुल म्हणाला ,”सध्या मी मालिकेत काम करतोय. शूटिंग 12-15 तास चालतं, पण तरी शक्य झालं की जिमला जातो. आता माझ्या डायटमध्ये काय खायचं आणि किती खायचं हे अगदी ठरलेलं असतं – चिकन, अंडी, सलाड, ग्रीन टी. साखर आणि मीठ जवळजवळ बंद केलंय. आपण वजन का कमी करतोय , हे लक्षात ठेवलं की सगळं सोपं होतं. मी अभिनेता आहे, आणि एक अभिनेता म्हणून फिट असणं गरजेचं आहे. म्हणून मी माझ्या खाण्यावर नियंत्रण ठेवतो.
कधी कधी मला मटण, रस्सा, बिर्याणी, मोमोज, आणि आईच्या हातची पुरणपोळी यांना नाही म्हणणं खरंच अवघड जातं. पण जेव्हा मी आवडीचे पदार्थ खातो तेव्हा दुप्पट व्यायामही करतो कारण शेवटी फिट राहणं हेच माझं ध्येय आहे.मला प्रेक्षकांना ही हेच सांगायला आवडेल की, स्वतःवर प्रेम करा, आरोग्याची काळजी घ्या, भरपूर पाणी प्या. नेहमीच फिट आणि निरोगी आरोग्यासाठी दैनंदिन आहारात तिखट किंवा मसालेदार पदार्थांचे अतिसेवन करण्यापेक्षा शरीराला पचन होणाऱ्या हलक्या आणि कमी कॅलरीजयुक्त पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे. याशिवाय शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.