लठ्ठपणा ठरतोय पॅनक्रिएटिक कॅन्सरला कारणीभूत
50 वर्षाखालील लोकांमध्ये लठ्ठपणामुळे स्वादुपिंडाच्या कर्करोगाचा धोका 20 टक्क्यांनी वाढू शकतो, असे नुकत्याच झालेल्या एका संशोधनात दिसून आले आहे. ओहायो स्टेट युनिव्हर्सिटीच्या वेक्सलर मेडिकल सेंटरच्या संशोधकांच्या मते, स्वादुपिंडाच्या कर्करोगाबद्दल लोकांमध्ये जागरुकता कमी आहे आणि बहुतेक लोकांना असे वाटते की हा आजार फक्त वृद्धांनाच होतो.
मात्र या अभ्यासातून असे दिसून आले आहे की स्वादुपिंडाच्या कर्करोगाचे प्रमाण दरवर्षी सुमारे एक टक्क्याने वाढत आहे आणि 40 वर्षांखालील लोकांमध्ये प्रकरणे अधिक सामान्य होत आहेत. तर याचे कारण म्हणजे लठ्ठपणा असल्याचेही मानले जात आहे. (फोटो सौजन्य – iStock)
कसा केला अभ्यास
स्वादुपिंडाच्या कर्करोगाच्या जोखमीचे सर्व्हेक्षण
या अभ्यासात संशोधकांनी 4 ते 7 ऑक्टोबर दरम्यान अमेरिकेतील 1,004 लोकांचे सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात स्वादुपिंडाच्या कर्करोगाच्या जोखमीच्या घटकांबद्दल प्रश्न विचारण्यात आले. परिणामांवरून असे दिसून आले की 50 वर्षांखालील अर्ध्याहून अधिक अर्थात 53 टक्के प्रौढांनी सांगितले की ते रोगाची सुरुवातीची लक्षणे ओळखू शकत नाहीत. याव्यतिरिक्त, एक तृतीयांश पेक्षा जास्त अर्थात 37 टक्के व्यक्तींना असा विश्वास आहे की ते त्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी काहीही करू शकत नाहीत.
हेदेखील वाचा – Colorectal Cancer: कोलोरेक्टल कॅन्सर का होतो? लक्षण, उपाय आणि कशी घ्यावी काळजी
जागरूकतेची कमतरता
या अभ्यासाचे परिणाम असे दर्शवतात की एक तृतीयांश अर्थात 33 टक्केपेक्षा जास्त लोकांचा असा विश्वास आहे की केवळ वृद्ध लोकांना स्वादुपिंडाच्या कर्करोगाचा धोका असतो. संशोधक Cruz-Monserrate म्हणाले, “हे चिंताजनक आहे कारण स्वादुपिंडाच्या कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी पहिली पायरी म्हणजे आपल्या शरीराचे निरोगी वजन राखणे. लठ्ठपणामुळे या कर्करोगाचा धोका 20 टक्क्यांनी वाढतो आहे”
अनुवंशिकता आणि जीवनशैलीचा परिणाम
जीवनशैलीचा होतोय अधिक परिणाम
अमेरिकन कॅन्सर सोसायटी (ACS) च्या मते, केवळ 10 टक्के स्वादुपिंडाचे कर्करोग अनुवांशिक जोखमीशी संबंधित आहेत, ज्यात BRCA जनुक आणि लिंच सिंड्रोम सारख्या चिन्हकांचा समावेश आहे. Cruz-Monserrate यांनी या वस्तुस्थितीवर जोर देत सांगितले की, “तुम्ही तुमची जीन्स बदलू शकत नाही, परंतु तुम्ही तुमची जीवनशैली सुधारू शकता. लठ्ठपणा कमी करणे बहुतेक लोकांसाठी शक्य आहे, आणि ते टाइप 2 मधुमेह, इतर कर्करोग आणि हृदयविकारांना प्रतिबंधित करते. त्यामुळे वेळीच याकडे लक्ष द्या” सध्या अनेकांना वेगवेगळ्या कॅन्सरचा धोका दिसून येत आहे. मात्र याला सर्वस्वी कारणीभूत आपले राहणीमान असल्याचेही आता सिद्ध होतंय. अनुवंशिकता हा कॅन्सरचा एक भाग आहेच. मात्र अधिकाधिक वाढ ही बदललेल्या जीवनशैलीमुळे दिसून येत आहे.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.