पावसाळ्यात होणारे श्वसनाचे आजार
पावसाळ्यात धुलीकण, परागकण, हवेतील ओलसरपणा,प्रदुषक या कारणांमुळे श्वसनाच्या समस्या उद्भवतात. त्यामुळे पावसाळ्यात सामान्य सर्दी-पडसे, न्यूमोनिया, ब्राँकायटिस आणि दमा यासारख्या श्वसन संक्रमणाचा धोका वाढतो.
हवामान आणि तापमानातील बदल हे जंतू आणि जीवाणूंच्या वाढीसाठी उत्तम ठरते. पावसाळ्यात तुमच्या श्वसनासंबंधी आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. वापरलेल्या टिश्यूची योग्य विल्हेवाट लावणे, वारंवार हात स्वच्छ धुवून घेणे आणि हवेतील रोगजंतू आणि विषारी द्रव्यांचा थेट संपर्क कमी करण्यासाठी गरज भासल्यास मास्कचा वापर करुन स्वच्छता राखण्याचा सल्ला दिला जातो. डॉ. समीर गर्दे, फुफ्फुसविकार तज्ज्ञ आणि फुफ्फुस प्रत्यारोपण विभागाचे संचालक, ग्लेनईगल्स हॉस्पिटल, परेल यांनी अधिक सोप्या पद्धतीने सांगितले आहे. (फोटो सौजन्य – iStock)
सर्दी-पडसे
सर्दी – खोकला कॉमन आजार
पावसाळ्यात आढळणारा श्वसन संसर्ग सर्वात सामान्यपणे आढळणारा प्रकार आहे. हवामानातील संक्रमणकालीन बदलामुळे विषाणूंच्या अनेक प्रकारांमुळे सर्दी होऊ शकते. कोणत्याही वयाच्या व्यक्तीला सर्दीची लागण होऊ शकते. यामध्ये छातीत घरघर, घसा खवखवणे, खोकला, सर्दी, डोकेदुखी आणि नाक वाहणे यासारख्या लक्षणांचा समावेश होतो. डॉक्टरांनी सांगितलेली आवश्यक खबरदारी आणि औषधे घेतल्यानंतर काही दिवसांत लक्षणे कमी होऊ लागतात.
हेदेखील वाचा – पावसात भिजल्यामुळे उद्भवू शकतात आरोग्यसंबंधित ‘हे’ गंभीर आजार,जाणून घ्या सविस्तर
न्युमोनिया
न्यूमोनियापासून राहा सावध
हा फुफ्फुसाचा गंभीर संसर्ग आहे ज्यामुळे अस्वस्थता आणि श्वसनासंबंधी विकार होतो. यामुळे पावसाळ्यात वाढलेल्या ओलाव्यामुळे आणि वातावरणातील ओलसरपणामुळे न्यूमोनिया होण्याचा धोका वाढतो. या काळात लोकांना सावध राहण्याचा सल्ला दिला जातो कारण ते संक्रमित व्यक्तीकडून इतर व्यक्तीमध्ये पसरु शकते.
ब्राँकायटिस
ब्राँकायटिस श्वसनाचा आजार
यामुळे फुफ्फुसातील वायुमार्गात तीव्र जळजळ होते. या जळजळीमुळे, एखाद्याला खोकला येऊ शकतो आणि श्वास घेण्यास त्रास होतो. ब्राँकायटिसमुळे श्वासनलिका अरुंद होते आणि फुफ्फुसातील हवेचा प्रवाह मर्यादित होतो. मुलांना आणि मोठ्यांना याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.
हेदेखील वाचा – पावसाळ्यातील आजारांपासून ‘अशा’ पद्धतीने करा शरीराचे रक्षण, आरोग्य राहील निरोगी
दमा
दम्याचा आजारही वाढतो
पर्यावरणीय घटक तसेच जीवनशैलीतील बदलामुळे पावसाळ्यात दम्याची लक्षणे वाढू शकतात. वाढलेली आर्द्रता, ओलावा आणि वातावरणातील दबाव श्वसनमार्गात अडथळा निर्माण करु शकतो ज्यामुळे श्वास घेणे नेहमीपेक्षा कठीण होते. पावसाळ्यातील सोसाट्याचा वारा हवेत परागकण आणि धुळीचे कण पसरवू शकतात. हे कण सहजपणे श्वासावाटे आत घेतले जातात कारण ते आकाराने लहान असतात ज्यामुळे श्वसनासंबंधी विकार उद्भवतात.
भविष्यातील गुंतागुंत टाळण्यासाठी तुम्ही तुमचा इनहेलर सोबत बाळगा. पाळीव प्राण्यांशी जवळचा संपर्क टाळा कारण त्यांचा कोंडा आणि लाळ तुमची लक्षणे आणखी वाढवू शकते.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.