पावसाळ्यात का वाढत आहे डिहायड्रेशन (फोटो सौजन्य - iStock)
उन्हाचा तडाखा सहन केल्यानंतर पावसाळा सुरु होताच उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळतो. पण जसजसे हवामान बदलते तसतशी तहान कमी होऊ लागते. पावसाळ्यात हवामानात आर्द्रता जास्त असल्यामुळे शरीरातून भरपूर प्रमाणात घाम येतो आणि पाण्याची कमतरता निर्माण होते. याच काळात आपल्याकडून कमी पाणी प्यायले जाते कारण या दिवसांत तहान फारच कमी लागते. लहानांपासून ते वयोवृध्दांपर्यंत सर्वच वयोगटात, निर्जलीकरणाची(डिहायड्रेशन) समस्या आढळून येत आहे. म्हणूनच गरज भासल्यास वैद्यकीय मदत घेणे गरजेचे आहे.
मुंबईतील झायनोव्हा रूग्णालयातील इंटरनल मेडिसिन एक्सपर्ट डॉ. निमित नागदा म्हणाले, पावसाळ्यात केवळ अतिसार, बद्धकोष्ठताच नाही तर डिहायड्रेशन ही देखील एक सामान्य घटना आहे. जेव्हा तुमचे शरीर जेवढ्या द्रवपदार्थाचे सेवन करते त्यापेक्षा जास्त द्रवपदार्थ गमावते तेव्हा डिहायड्रेशनची समस्या होते. याचा तुमच्या अवयवांच्या कार्यावर परिणाम होतो आणि मूत्रपिंडांवर ताण येणे, थकवा जाणवणे, चक्कर येणे, उष्माघात आणि वेळीच उपचार न केल्यास रुग्णालयात दाखल होणे यासारख्या गंभीर गुंतागुंत होऊ शकतात.
3 वर्षाखालील मुलांमध्ये जुलाब आणि डिहायड्रशेन प्रकरणांमध्ये वाढ, कोणते उपाय करावेत
नेमके कारण काय?
कमी तापमानामुळे पावसाळ्यात लोकांना तहान कमी लागते, पण याचा अर्थ असा नाही की त्यांच्या शरीराला गरज नाही. पावसाळ्यात गॅस्ट्रोइंटेस्टाइनल इन्फेक्शन खूप सामान्य असतात आणि त्यामुळे अतिसार आणि उलट्या होऊन द्रव आणि इलेक्ट्रोलाइट जलदरित्या कमी होतात, ज्यामुळे डिहायड्रेशनचा धोका वाढतो. कामाच्या वेळी किंवा प्रवासादरम्यान पुरेसे पाणी न प्यायल्याने, जास्त घाम आल्याने देखील डिहायड्रेशनची समस्या सतावत आहे.
काय आहेत लक्षणे आणि उपाय
डॉ. नागदा पुढे म्हणाले की, ओपीडीमध्ये उपचाराकरिता येणाऱ्या २५ ते ५५ वयोगटातील १० पैकी ७ व्यक्तींमध्ये तोंड आणि ओठ कोरडे पडणे, थकवा आणि अशक्तपणा जाणवणे, गडद पिवळ्या रंगाची लघवी किंवा लघवी कमी होणे, चक्कर येणे किंवा डोकेदुखी आणि स्नायूंमधील वेदना अशा तक्रारी आढळून आल्या आहेत.
डिहायड्रेशनच्या उपचारांमध्ये शरीरातील पाण्याची पातळी प्रमाणात राहील याकरिता ORS चे सेवन करणे आणि गंभीर प्रकरणांमध्ये आयव्ही फ्लुइड्सद्वारे उपचारांचा केले जातात. प्रत्येकाने डिहायड्रेशनची समस्या टाळण्यासाठी पुरेसे पाणी पिण्याची आणि हायड्रेटेड राहण्याची खात्री करा.
पावसाळ्यात सुद्धा होऊ शकतं Dehydration, ‘या’ ५ ड्रिंक्स ठेवतील तुम्हाला Hydrate
डिहायड्रेशन कसे ओळखावे
मुंबईतील अपोलो डायग्नोस्टिकच्या रिजनल टेक्निकल चीफ, डॉ. उपासना गर्ग म्हणाल्या की, जर डिहायड्रेशनची समस्या जाणवत असेल तर रुग्णाला साध्या रक्त चाचण्या (जसे की सीरम इलेक्ट्रोलाइट्स, युरिया आणि क्रिएटिनिन) तसेच लघवीचे विश्लेषण करण्याचा सल्ला दिला जातो. डिहायड्रेशनचे वेळीच निदान आणि उपचार गंभीर हे गुंतागुंत टाळू शकतात.
डिहायड्रेशनमुळे थकवा, मूत्रपिंडावर ताण वाढणे, रक्तदाब कमी होणे, इलेक्ट्रोलाइट असंतुलन आणि गंभीर प्रकरणांमध्ये रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता वाढू शकते. पावसाळ्यातही, लोकांनी ठराविक अंतराने पाणी प्यावे, विशेषतः जर ते संसर्गातून बरे होत असतील किंवा कामानिमित्त जास्त वेळ घराबाहेर रहावे लागत असेल. हायड्रेटेड राहणे ही केवळ उन्हाळ्यातच गरजेचे नाही तर ही वर्षभराची म्हणजेच सर्वच ऋतूंमध्ये गरजेचे आहे.