'या' व्यक्तींनी आहारात चुकूनही करू नका कडुलिंबाच्या पानांचे सेवन!
प्राचीन काळापासून आयुर्वेदामध्ये कडुलिंबाच्या पानांना विशेष महत्व आहे. पूर्वी आरोग्यासंबंधित कोणतीही समस्या उद्भवल्यानंतर कडुलिंबाच्या पानांचा रस किंवा कडुलिंबाचे पान खाण्यास दिले जायचे. या पानांमध्ये असलेले आयुर्वेदिक आणि औषधी गुणधर्म आरोग्यासाठी अतिशय प्रभावी ठरतात. पचनसंबंधित समस्या उद्भवू लागल्यास कडुलिंबाच्या पानांचे सेवन करावे. याशिवाय कडुलिंबाची पाने, देठ आणि लिंबोळ्या अतिशय महत्वाच्या आहेत. गुढीपाडव्याच्या दिवशी गुढीला कडुलिंबाची पाने आणि गुळाचा नैवद्य दाखवला जातो. या पानांचे सेवन केल्यामुळे शरीरातील साखरेची पातळी कमी होते, कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते इत्यादी अनेक समस्यांपासून आराम मिळतो.(फोटो सौजन्य – iStock)
महिनाभरात वाढलेले वजन कमी करण्यासाठी नियमित करा ‘या’ पिवळ्या पाण्याचे सेवन, पोटावरील चरबी होईल कमी
कडुलिंबाच्या पानांमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म आढळून येतात, ज्यामुळे साथीच्या आजारांमुळे शरीराचे नुकसान होत नाही. शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी कडुलिंबाच्या पानांचा रस पिऊन त्यावर गरम पाण्याचे सेवन करावे. यामुळे शरीर आणि आतड्यांमध्ये साचून राहिलेली सर्वच घाण निघून जाईल. मात्र काहींच्या आरोग्यासाठी कडुलिंबाची पाने अतिशय धोक्याची ठरतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला कडुलिंबाच्या पानांचे सेवन कोणत्या व्यक्तींनी करू नये, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
गर्भवती महिलांनी चुकूनही कडुलिंबाच्या पानांचे किंवा रसाचे सेवन करू नये. यामुळे पोटातील गर्भावर गंभीर परिणाम होतो, ज्यामुळे काहीवेळा गर्भपात होण्याची शक्यता असते. त्यामुळे कडुलिंबाच्या पानांचे सेवन करण्याआधी गर्भवती महिलांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. ऑटोइम्यून आजार असलेल्या व्यक्तींनी कडुलिंबाची पाने खाऊ नये. यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारते, पण ऑटोइम्यून आजाराची लक्षणे शरीरात झपाट्याने दिसून येतात. त्यामुळे कडुलिंबाच्या पानांचे सेवन करू नये.
लहान मुलांची पचनक्रिया अतिशय नाजूक आणि संवेदनशील असते. कडुलिंबाच्या पानांचे सेवन लहान मुलांना करण्यास दिल्यास मुलांच्या पचनक्रियेवर गंभीर परिणाम दिसून येतील. मुलांना उलट्या, जुलाब, मळमळ याशिवाय पोटात सतत दुखू लागते. कडुलिंबाची पाने लहान मुलांच्या पचनसंस्थेवर परिणाम करतात.
रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर शरीरात अनेक बदल होऊ लागतात. या बदलांकडे दुर्लक्ष केल्यास शरीरातील इतर अवयवांना इजा पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे मधुमेह झाल्यानंतर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कडुलिंबाच्या पानांचे सेवन मधुमेह असलेले रुग्ण मोठ्या प्रमाणात करतात. मात्र जास्त सेवन केल्यामुळे रक्तातील साखर खूप जास्त कमी होऊन जाते.