(फोटो सौजन्य: Pinterest)
गोल्डन टेंपलचा उल्लेख झाला की सर्वांच्या मनात सर्वप्रथम पंजाबमधील अमृतसरचा स्वर्णमंदिर डोळ्यासमोर येतो. हे मंदिर शीख धर्मातील एक पवित्र तीर्थस्थान असून, दरवर्षी लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. पण भारतात केवळ एकच स्वर्णमंदिर आहे असं नाही. दक्षिण भारतातील तामिळनाडू राज्यात, वेल्लोर शहरातही एक भव्य स्वर्णमंदिर आहे. हे मंदिर श्रीलक्ष्मीला समर्पित असल्याने याला “महालक्ष्मी मंदिर” असंही म्हटलं जातं.
दक्षिणेतील स्वर्णमंदिर
तामिळनाडूच्या वेल्लोरपासून सुमारे ७ किमी अंतरावर, थिरुमलाईकोडी या ठिकाणी हे भव्य मंदिर आहे. चेन्नईहून येताना सुमारे १४५ किमीचा प्रवास करावा लागतो. मंदिराच्या बांधकामासाठी सुमारे १,५०० किलो शुद्ध सोन्याचा वापर करण्यात आला असून, प्रवेशद्वार हे मुख्य मंदिरापासून अंदाजे दीड ते दोन किमी अंतरावर आहे. या मार्गावरून चालत जाताना दोन्ही बाजूला दाट हिरवळ दिसते.
मंदिराची वैशिष्ट्ये
श्रीलक्ष्मी नारायणी मंदिराच्या बांधकामासाठी सुमारे ३०० कोटी रुपयांचा खर्च झाला. मुख्य गर्भगृह, भिंती आणि शिखर सर्वत्र सोन्याची नक्षी आहे. मंदिरातील माता लक्ष्मीची मूर्ती सुमारे ७० किलो सोन्याची असून ती अत्यंत जिवंत भासते. दिवसा मंदिराची सोन्याची झळाळी दृष्टीस पडते, तर रात्री प्रकाशाच्या झोतांमध्ये त्याची भव्यता अधिक खुलते. परिसरात २७ फूट उंच दीपमाळ आहे. त्यात दिवे लावल्यानंतर सोन्याच्या पार्श्वभूमीवरचा तो नजारा अवर्णनीय असतो.
तिरंगा फडकवण्याची परंपरा
लोकसभा, राष्ट्रपती भवन यांसारख्या ठिकाणी जसा तिरंगा फडकवला जातो, तसाच तिरंगा येथेही फडकवला जातो. हे मंदिर केवळ हिंदूंसाठीच नव्हे, तर सर्व धर्मीयांसाठी खुले आहे. सन २००७ मध्ये मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले असून, याची भव्यता अनेक प्राचीन मंदिरांनाही मागे टाकते.
येथे कसे पोहोचाल?
हवाई मार्गाने यायचे असल्यास सर्वात जवळचे विमानतळ तिरुपती (सुमारे १२० किमी) आणि चेन्नई (सुमारे १४५ किमी) आहेत. रेल्वेने येताना वेल्लोरजवळील कटपडी स्टेशन (सुमारे ७ किमी अंतर) सर्वात सोयीचे आहे. तसेच रस्त्यानेही येथे सहज पोहोचता येते.
मंदिरात जाण्याची वेळ काय आहे?
मंदिर सकाळी ८:०० ते रात्री ८:०० वाजेपर्यंत उघडे असते.
मंदिरात जाण्यासाठी प्रवेश शुल्क आहे का?
नाही, मंदिराला भेट देण्यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही.