गुडघेदुखीवर करा आधुनिक पद्धतीने उपचार! वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी प्रभावी ठरते पीआरपीटी थेरपी
गुडघेदुखी ही सर्वच वयोगटातील व्यक्तींमध्ये आढळणारी एक सामान्य समस्या आहे. सततची गुडघेदुखी ही एखाद्याची दैनंदिन कामांमध्ये अडथळा निर्माण करते तसेच नैराश्यासही कारणीभूत ठरु शकते. या गुडघेदुखीमुळे एखाद्याला चालणे, जिने चढणे, बसणे-उठणे किंवा झोपणे यासारख्या दैनंदिन क्रिया देखील वेदनादायक ठरू शकतात. त्यामुळे या वेदनेचे वेळीच व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. प्लेटलेट रिच प्लाझ्मा (PRP) थेरपी ही सततच्या गुडघेदुखीवर दिलासा देणारी आधुनिक उपचारपद्धत आहे. पीआरपी थेरपी एखाद्या व्यक्तीची गुडघेदुखी नियंत्रणात आणण्यास कशाप्रक्रारे मदत करते तसेच त्यामुळे त्या व्यक्तीचे जीवनमान कसे सुधारते, याबद्दल डॉ. अनुप गाडेकर, ऑर्थोपेडिक आणि जॉईट रिप्लेसमेंट सर्जन, अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटल, पुणे यांनी लेखाच्या माध्यमातून सविस्तर माहिती दिली आहे.(फोटो सौजन्य – istock)
ऑस्टिओआर्थरायटिस, खेळांमधील दुखापती, लठ्ठपणा किंवा गुडघ्याच्या सांध्याची वयानुसार होणारी झीज अशा कारणांमुळे बऱ्याच व्यक्तींना गुडघेदुखीची समस्या सतावते. अनेक वर्षांपासून गुडघेदुखीवरील उपचारांमध्ये वेदनाशामक औषधं, फिजिओथेरपी किंवा गंभीर प्रकरणांमध्ये शस्त्रक्रियेसारखा पर्याय वापरला जातो. सध्या, प्रगत तंत्रज्ञानामुळे, प्लेटलेट रिच प्लाझ्मा (PRP) थेरपी नावाची मिनिमली इनवेसिव्ह शस्त्रक्रियेचा पर्याय वेदना कमी करण्यास आणि प्रभावी उपचारांकरिता वापरला जातो. हा एक सुरक्षित आणि प्रभावी उपाय ठरत आहे.
पीआरपी थेरपीमध्ये रुग्णाच्या स्वतःच्या रक्ताचा थोडा नमुना घेतला जातो. विशेष यंत्राच्या मदतीने त्या रक्तातील प्लेटलेट्स वेगळे करून त्यांचे प्रमाण वाढवले जाते. हे प्लेटलेट्स ‘ग्रोथ फॅक्टर्स’ने समृद्ध असतात, जे शरीरातील खराब झालेले ऊतक दुरुस्त करण्यास मदत करतात. हे तयार केलेले प्लाझ्मा गुडघ्याच्या दुखत असलेल्या भागात इंजेक्शनद्वारे दिले जाते. सुरुवातीला ते मध्यम स्वरूपाच्या ऑस्टिओआर्थरायटिस, खेळाशी संबंधित गुडघ्याच्या दुखापती, अस्थिबंधांच्या समस्या आणि औषधे किंवा फिजिओथेरपीने फारसा फरक न पडलेल्या रुग्णांकरिता वापरले जाऊ शकते.
ऑस्टिओआर्थरायटिस किंवा अस्थिबंध आणि कूर्चेच्या दुखापतीसारख्या परिस्थितीत, गुडघ्याचा सांधा कालांतराने सुजतो आणि खराब होतो. पीआरपी इंजेक्शन्स हे सूज कमी करून, सांध्यातील वंगण सुधारून आणि ऊतींच्या दुरुस्तीस मदत करतात. पीआरपीमधील वाढीचे घटक शरीराच्या नैसर्गिक उपचार प्रक्रियेला प्रोत्साहन देतात, ज्यामुळे वेदना कमी होतात आणि सांध्यांची हालचाल सुधारण्यास मदत होते.
देशात फॅटी लिव्हरचे प्रमाण वाढते! रिसर्चमधून आले निदर्शनास, आतापासून टाळा या चुका
या प्रक्रियेनंतर रुग्ण एक-दोन दिवसांत दैनंदिन क्रियेला सुरुवात करु शकतो. पुढील २ ते ३ आठवड्यांनंतर रुग्णाला वेदना कमी झाल्याचे आणि गुडघ्याच्या कार्यात सुधारणा झाल्याचे दिसून येते. पीआरपी थेरपी हा संधिवात पूर्णपणे बरा करत नाही, परंतु तो तुम्हाला वेदनेचा सामना करण्यास, शारीरीक हालचाल आणि जीवनाची गुणवत्ता सुधारण्सास मदत करू शकते. गुडघेदुखीचा सामना करण्यासाठी पीआरपी थेरपी हा एक सुरक्षित, नैसर्गिक आणि प्रभावी पर्याय आहे. पीआरपी थेरपी फिजिओथेरपी आणि वजन व्यवस्थापनासह घेतली जाऊ शकते आणि त्यामुळे त्वरित शस्त्रक्रिया करण्याची गरज भासत नाही. त्यामुळे गुडघेदुखीची समस्या सतावत असल्यास ऑर्थोपेडिक तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि पीआरपी थेरपीचा पर्याय निवडा.
Ans: गुडघ्याच्या सांध्यात सूज येणे आणि तो कडक वाटणे.
Ans: चुकीच्या पद्धतीने व्यायाम करणे किंवा अचानक हालचाल करणे.
Ans: गुडघ्याला सूज, लालसरपणा आणि ताप असल्यास.






