काय आहे भूतिया राजीनामा अर्थात Ghost Resignation (फोटो सौजन्य - iStock)
आजच्या आधुनिक युगात, कामाच्या ठिकाणी अनेक बदल दिसून येतात. त्यातही जनरेशन Z प्रचंड बदनाम झालेली दिसून येत आहे. फक्त कामाच्या वेळेतच काम करणार, कोणतेही इमोशन्स वा भावना नाही. कोणाबद्दलही आदर नाही अशी ही पिढी कॉर्पोरेट कल्चर वाढताना दिसून येत आहे. या पिढीचे शब्दही वेगळे आहेत. यापैकी एक शब्द म्हणजे Ghost Resignation. जनरेशन झेडमध्ये सध्या हा खूप ट्रेंड करत आहे. चला तर मग जाणून घेऊया की भूतिया राजीनामा म्हणजे काय आणि या पिढीमध्ये तो का ट्रेंड करत आहे? (फोटो सौजन्य – iStock)
खरं तर, जनरेशन झेडमध्ये Ghost Resignation चा ट्रेंड खूप सुरू आहे. याचा अर्थ जेव्हा एखादा कर्मचारी अचानक नोकरीवरून किंवा कोणत्याही पूर्व माहिती किंवा औपचारिकतांशिवाय, ईमेल, फोन किंवा सूचना न देता गायब होतो – तेव्हा त्याला Ghost Resignation अर्थात भूतिया राजीनामा असे म्हणतात. हा एक प्रकारचा कॉर्पोरेट ट्रेंड बनला आहे. त्याच वेळी, हा ट्रेंड विशेषतः जनरेशन झेड आणि मिलेनियल्समध्ये अधिक दिसून येत आहे.
Gen Z कडून कामे करवून घेणे कठीण? जाणून घ्या, ‘या’ रिपोर्टचा खुलासा
अशा परिस्थितीत, कंपन्यांसाठी एक समस्या उद्भवते, जेव्हा कर्मचारी अचानक गायब होतो. यामुळे, चालू असणारे प्रकल्प आणि टीमवर्कवर त्याचा मोठा परिणाम होताना दिसून येतो. जनरेशन झेडमध्ये हा ट्रेंड वाढण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे कर्मचारी कामाच्या ताणापेक्षा त्याच्या मानसिक आरोग्याला जास्त प्राधान्य देतो.
त्याच वेळी, जर ऑफिसचे वातावरण नकारात्मक असेल तर अशा परिस्थितीत त्यांना तिथे काम करावेसे वाटत नाही. ही पिढी वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी काम करून कंटाळते. पूर्वीच्या पिढीसारखे ऐकून घेत ही पिढी काम करत थांबत नाही. आता, जेव्हा जेव्हा त्यांना नवीन संधी मिळते तेव्हा ते लगेच ऑफिस सोडण्याचा किंवा कोणालाही न सांगता निर्णय घेतात. कोणत्याही प्रकारचे प्रोफेशनल मॅनर्स या पिढीत नसल्याने अशा पद्धतीच्या राजीनाम्याला Ghost Resignation असे म्हटलं जात आहे.
जरी फ्रीलान्सिंग, यूट्यूब इत्यादी पर्याय जनरेशन झेडला अधिक आकर्षक वाटत असले तरी, जेव्हा ऑफिसचे काम समाधान देत नाही तेव्हा ते लगेच नोकरी सोडतात. या पिढीसाठी, नोकरी ही केवळ पगाराचे साधन नाही; तर नोकरी वैयक्तिक समाधान, मूल्ये आणि मानसिक आरोग्याशी जोडलेली आहे. जेव्हा एखाद्याला समाधान किंवा उद्देश मिळत नाही तेव्हा ते निर्भयपणे नोकरी सोडतात आणि त्यांना कंपनीचा फायदा अथवा कंपनीतील कामाशी काहीही देणंघेणं नसतं.
या पिढीला स्वतःचं समाधान, आपल्याला मिळणारा मोबदला, मानसिक आरोग्य आणि वेळोवेळी सुट्टी मिळणं हे अधिक महत्त्वाचं वाटतं. कोणत्याही कामात स्वतःला झोकून देण्यापेक्षा जितका मोबदला मिळतोय तितकंच काम करायचं अशा मानसिक जडणघडणीतून ही पिढी आलेली असल्याने इतर कोणाचाही विचार न करता ही पिढी त्वरीत कोणतीही नोकरी सोडू शकते आणि त्याचा कंपनीला फटका बसत असल्याने Ghost Resignation असे या ट्रेंडला नाव देण्यात आले आहे.