12 New Dialysis Centers to Open in the State
मुंबई : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याच्या आरोग्य पायाभूत सुविधांमध्ये मोठी भर पडणार आहे. राज्य सरकारच्या महा-डायलिसिस योजनेअंतर्गत १ मे रोजी १२ नवीन डायलिसिस केंद्रांचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या विस्तारामुळे राज्यातील एकूण डायलिसिस केंद्रांची संख्या १०४ वर पोहोचणार असून, ग्रामीण आणि दुर्गम भागातील किडनी रुग्णांना याचा मोठा फायदा होणार आहे.
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते महाराष्ट्र दिन सोहळ्याचा भाग म्हणून या केंद्रांचे लोकार्पण केले जाणार आहे. सध्या संपूर्ण राज्यात ९२ केंद्रे कार्यरत असून, त्यामध्ये ५५८ डायलिसिस खाटांची सोय आहे. ग्रामीण, उपजिल्हा आणि जिल्हा रुग्णालयांच्या माध्यमातून ही सेवा दिली जाते. प्रत्येक ग्रामीण रुग्णालयात किमान पाच डायलिसिस खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे, तर मोठ्या रुग्णालयांमध्ये ही संख्या ८ ते १० दरम्यान आहे. या नवीन केंद्रांमुळे रुग्णांना मोफत आणि सुलभ उपचार मिळणे शक्य होणार असून, खासगी रुग्णालयांवरील अवलंबित्व कमी होणार आहे.
चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोलीला लाभ
कोल्हापूरमधील मुरगुड, चंद्रपूरमधील मूल, यवतमाळमधील दारव्हा, बीडमधील केज, नाशिकमधील इगतपुरी, जळगावमधील रावेर, सोलापूरमधील मंगळवेढा, सातारा जिल्ह्यातील ढेबेवाडी, सिंधुदुर्गमधील वेंगुर्ला, गडचिरोलीतील कुरखेडा, रत्नागिरीतील दापोली आणि ठाण्यातील बदलापूर या ठिकाणी ही नवीन केंद्रे सुरू होत आहेत. महा डायलिसिस योजना डिजिटल प्लॅटफॉर्मवर आधारित असून रुग्ण वेबसाइट आणि मोबाइल अॅपद्वारे आगाऊ नोंदणी करू शकतात. यामुळे रुग्णांचा प्रतीक्षा कालावधी कमी होण्यास मदत होत आहे.
राज्यात प्रथमच मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून…
दुसरीकडे, क्राउड फंडिंग आणि त्रिपक्षीय सामंजस्य करारातून गरिब आणि गरजू रूग्णांना उपचार देण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या माध्यमातून ‘त्रिपक्षीय सामंजस्य करार आणि क्राउड फंडिंग’ या दोन आर्थिक मदतीच्या संकल्पनांवर आधारित ही मदत देण्यात येणार आहे. त्यात कॉर्पोरेट कंपन्या, दाते आणि रुग्णालये यांचे सहकार्य रूग्णांना मिळणार असून, त्यातून हजारो रुग्णांना दिलासा मिळणार आहे.






