38th National Games : महाराष्ट्राने पटकावले सर्वोत्तम राज्य विजेतेपद; उत्तराखंडात महाराष्ट्राचा जयजयकार
हल्दवानी : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पदकांचे व्दिशतक झळकविणार्या महाराष्ट्राला सर्वोत्तम राज्य विजेतेपदाच्या करंडकाने आज गौरविण्यात आले. केंद्रीय गृहमंत्री अमीत शहा यांच्या हस्ते महाराष्ट्राला राज्य विजेतेपदाचा करंडक देण्यात आला. इंदिरा गांधी स्टेडियममध्ये 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा शानदार समारोप सोहळा रंगला. या दिमाखदार समारंभात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे (एमओए) महासचिव नामदेव शिरगावकर यांनी सर्वोत्तम राज्य विजेतेपदाच्या करंडका स्वीकारला.
पदतक्त्यात महाराष्ट्राचे दुसरे स्थान
यावेळी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडविया, भारतीय ऑलिम्पिक महासंघाच्या अध्यक्ष पी.टी. उषा, उत्तराखंडच्या क्रीडामंत्री रेखा आर्या, महाराष्ट्र संघाचे पथकप्रमुख संजय शेटे, उदय डोंगरे, विठ्ठल शिरगांवकर उपस्थित होते. उत्तराखंडातील स्पर्धेत 54 सुवर्णांसह 71 रौप्य, 76 कांस्य अशी एकूण 201 पदकांची लयलूट करीत पदकतक्यात महाराष्ट्राने दुसरे स्थान मिळविले. स्पर्धेत सलग तिसर्यांदा राज्यातील संघांमध्ये महाराष्ट्र अव्वल ठरला. अहमदाबाद, गोवा पाठोपाठ उत्तराखंड स्पर्धेत महाराष्ट्र देशातील संघांमध्ये अव्वल येण्याची ऐतिहासिक हॅटट्रिक साजरी केली आहे.
27 क्रीडा प्रकारांमध्ये महाराष्ट्राची पदके जिंकण्याची कामगिरी
तब्बल 27 क्रीडा प्रकारांत महाराष्ट्राने पदके जिंकण्याचा कामगिरी केली आहे. जिम्नॉस्टिक्स सर्वाधिक 12 सुवर्णांसह 24 पदके महाराष्ट्राने जिंकली आहेत. महाराष्ट्राने कौतुकास्पद कामगिरी केल्याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री व महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार, क्रीडामंत्री दत्तामामा भरणे यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.
सर्वाधिक 201 पदकांची कमाई करणारा महाराष्ट्र एकमेव संघ
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सर्वाधिक 201 पदकांची कमाई करणारा महाराष्ट्र देशातील एकमेव संघ ठरला आहे, सर्वोत्तम संघाचा मानही आपण पटकविला आहे असे सांगून नामदेव शिरगावकर म्हणाले की , महाराष्ट्राच्या पदकविजेत्यांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. महाराष्ट्राने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच सलग तिसर्यांदा राज्यांच्या संघात अव्वल स्थान संपादन केले आहे. देशात पुन्हा जय महाराष्ट्राचा जयजयकार होत असल्याचा आनंद मोठा आहे.