परवानगीशिवाय रस्ता खोदणे पडलं महागात; तब्बल 80 लाखांचा ठोठावला दंड (संग्रहित फोटो)
पुणे : महंमदवाडी परिसरात एलिना लिव्हिंग प्रकल्पासाठी विनापरवाना रस्ता खोदल्याने पुणे महानगरपालिकेने चाफळकर–करंदीकर डेव्हलपर्सवर कारवाई करत तब्बल ८० लाख ४६ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. दंड भरल्याशिवाय प्रकल्पाचे पुढील बांधकाम बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
एनआयबीएम अनेक्स–महंमदवाडी परिसरात एलिना लिव्हिंग प्रकल्पासाठी परवानगीशिवाय २२० मीटरचा रस्ता खोदल्याने पुणे महानगरपालिकेने कठोर भूमिका घेतली आहे. शुक्रवारी (दि.१३) रात्री साडेआठच्या सुमारास एस. एम. घुले चौकाजवळ हे काम सुरू असल्याचे स्थानिकांनी पाहिल्यानंतर नागरिकांनी यावर आक्षेप घेतला. कामगारांकडे विचारणा केली असता त्यांनी हे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे काम असल्याचे सांगितले. मात्र, चौकशीअंती या कंपनीकडे कोणतीही परवानगी नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर नागरिक अशोक मेहंदळे व जयमाला धनकीकर यांनी महापालिकेच्या पथ विभागाला तक्रार दिली.
हेदेखील वाचा : Pune Municipal Corporation Election 2025: पुणे महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजले! नवी प्रभागरचना जाहीर
पथ विभागाने घटनास्थळी पाहणी करून विनापरवाना खोदाईची खात्री केली. या कारवाईत चाफळकर–करंदीकर डेव्हलपर्सने रस्ते तोडल्याचे सिद्ध झाल्याने महापालिकेने २६ लाख ८२ हजार ४४० रुपयांच्या खोदाई शुल्काचा तीनपट दंड आकारून एकूण ८० लाख ४६ हजार ७२० रुपये वसूल करण्याचे आदेश दिले. ही रक्कम पूर्ण भरल्याशिवाय प्रकल्पाचे चालू बांधकाम थांबवणे आणि नवीन परवानगी न देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
ही कारवाई पथ विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल सोनवणे आणि विभागप्रमुख अनिरुद्ध बावस्कर यांच्या देखरेखीखाली पार पडली. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, “रस्ते खोदण्यासाठी नियमांचे काटेकोर पालन आवश्यक आहे. विनापरवाना काम झाल्यास तातडीची दंडात्मक कारवाई करण्यात येईल.”
दरम्यान, परिसरातील नागरिकांनी रात्रीच्या वेळी परवानगीशिवाय केलेली रस्ते खोदाई पाहून नाराजी व्यक्त केली. त्यांनी या प्रकारावर अधिक कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.






