सौजन्य - नवराष्ट्र टीम
कोल्हापूर : शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्याला देशोधडीला लावणारा असून, हा महामार्ग रद्द व्हावा या मागणी करिता 12 मार्चला विधानसभेवर भव्य मोर्चा काढणार असल्याचं विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केलं. शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या बैठकीत ते बोलत होते. शक्तीपीठ महामार्गबाधित 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची राज्यव्यापी बैठक, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शाहू स्मारक भवन येथे संपन्न झाली. यावेळी बोलताना त्यांनी, शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली.
राज्यात सत्तेत असणाऱ्या लोकांना कोल्हापूरची मोठी धास्ती होती, म्हणून कोल्हापुर पूर्ता महामार्ग रद्दचा निर्णय सत्तेतील काही मंत्र्यांनी जाहीर केला. मात्र याला कायदेशीर आधार नाही. सरकार मध्ये राहायचं, आणि त्यांच्याच मंत्र्यांनी आणि आमदारानी वेगवेगळी स्टेटमेंट करायचं हे सरकारच षडयंत्र असल्याची टिकाही आमदार सतेज पाटील यांनी केली. गोव्याकडे जाण्यासाठी पर्यायी रस्त्या असतानासुद्धा शक्तीपिठ का लादला जातं आहे. 86 हजार कोटीचा हा प्रकल्प असल्याचं सांगण्यात येत आहे. एवढी मोठी रक्कम पाहता एका किलो मीटरला, 110 कोटींचा खर्च येणार आहे. शक्तिपीठ मध्ये कोण फित्तुर होऊ नये यासाठी काळजी घेऊया. न्यायालयात जाण्याऐवजी ही लढाई रस्त्यावर करुया, असंही त्यांनी सांगितलं. येणाऱ्या अधिवेशनात महाविकास आघाडी म्हणुन आम्ही सर्व जण ताकतीने प्रश्न मांडू. आपापल्या जिल्हयातील आमदारांचे शक्तीविरोधाबाबत पत्र घ्या. शेतकऱ्याला देशोधडीला लावणारा हा प्रकल्प असून अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात 12 मार्चला भव्य मोर्चा काढण्याचही सतेज पाटील यांनी जाहीर केल. शेतकऱ्यांची ताकत सरकारला दाखऊन देऊ, मोठया संख्येने या मोर्चात सहभागी व्हा, असं आवाहनही त्यांनी केलं.
ठाकरे गटाचे कोल्हापूर सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांनी, शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात शेतकऱ्याच्या भावना तीव्र आहेत. आता या लढ्याला कोल्हापुरातून सुरुवात झाली आहे. कोणत्याही अधिकाऱ्याला रस्त्यावर फिरू देणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत राज्य, महायुती सरकारला चालवायचं होतं. मात्र शेतकऱ्यावर अन्याय सुरू आहे. हे सरकार गोरगरीब लोकांना मदत करणारे नाही. कधीही पोट न भरलेली माणस मंत्री मंडळात आहेत. त्यांना सर्व सामान्यांशी देणंघेणं नाही. अशी टिकाही त्यांनी केली.
काय आहे आहे शक्तीपीठ महामार्ग?
2023 मध्ये समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर शक्तीपीठ महामार्ग बांधण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. हा 802 किमी लांबीचा ग्रीनफिल्ड हायवे नागपूर ते गोव्याला थेट जोडेल. राज्यातील तीन शक्तीपीठांना हा महामार्ग जोडणार असल्याने या महामार्गाला ‘शक्तीपीठ’ महामार्ग असे देण्यात आलं आहे. राज्यातील सर्वात लांब हा सुपर एक्स्प्रेसवे असेल. हा महामार्ग वर्धा जिल्ह्यातून सुरू होऊन यवतमाळ, नांदेड, धाराशिवमार्गे सिंधुदुर्ग येथे संपेल. यालाच नागपूर-गोवा द्रुतगती महामार्ग म्हणजेच शक्तीपीठ द्रुतगती मार्ग म्हणून ओळखले जाते, हा महामार्ग 802 किलोमीटर लांबीचा आणि सहा-लेन प्रवेश-नियंत्रित द्रुतगती मार्ग आहे, हा महामार्ग नागपूर तसेच गोवा राज्यांना जोडला जाणार असून तो महाराष्ट्रातील 12 आणि गोव्यातील एका जिल्ह्यातून जाणार आहे.