नाशिक : गेल्या काही दिवसांपासून राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ (Maharashtra Crime) होत आहे. त्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना लक्षणीय आहेत. त्यात आता नाशिकमध्ये (Nashik Crime) एक धक्कादायक घटना घडली. एका अल्पवयीन मुलीला सोशल मीडियावरील मैत्री करणे चांगलेच महागात पडले आहे. या मुलीला न्यूड फोटो पोस्ट (Nude Photo) करण्यास भाग पाडण्यात आले. त्यानंतर तिच्याकडे शरीरसंबंधाची मागणी करत ब्लॅकमेक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.
नाशिक शहरातील एका वस्तीत राहणारी अल्पवयीन पीडित मुलीची संशयितांशी इन्स्टाग्राम आणि स्नॅपचॅट या सोशल साईट्सवरून ओळख झाली होती. ऑनलाइन माध्यमातून ते दररोज एकमेकांशी बोलत असायचे. यातील संशयित आरोपीने मुलीच्या अज्ञानाचा फायदा घेत तिला नग्न फोटोंची मागणी केली. त्यानुसार ते फोटो टाकण्यास भागही पाडले. त्यानंतर गेल्या आठवड्यात आरोपीने मुलीला ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देत पैशांची मागणी केली. तसेच तिच्याकडे शरीरसंबंधाची मागणी करत ब्लॅकमेक करण्यात आल्याचा आरोप आहे.
दोघांविरोधात गुन्हा दाखल
या अल्पवयीन मुलीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अथर्व शहाणे (22, औरंगाबाद) आणि सुहास जितेंद्र सराफ (25, सरस्वतीनगर, पंचक जेलरोड) या संशयितांविरोधात उवादा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






