नागपूर : नुकतेच त्याचे लग्न झाले होते. त्याच्या नवीन आयुष्याला सुरुवात होणार होती. मात्र, नवीन आयुष्याच्या प्रवासाला सुरुवात होण्यापूर्वीच त्याचा जीवनाचा प्रवास (Nagpur Accident) थांबला. अंगाची हळदही निघाली नव्हती की काळाने डाव साधला. अज्ञात वाहनाच्या धडकेत त्याचा जागीच मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना हुडकेश्वर पोलिस ठाण्यांतर्गत घडली.
निखिल विद्याधर हर्षे (वय 32) असे अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. निखिल हा चंद्रभागानगर येथे भाड्याने राहात होता. शनिवारी दुपारी तो काही कामाने दुचाकी घेऊन घराबाहेर पडला. जबलपूर ते नागपूर आउटर रिंग रोडने जात असताना टाटा मोटर्सजवळ अज्ञात वाहनाच्या चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव व निष्काळजीपणे चालून निखिलच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात धडकेत निखिल गंभीर जखमी झाला. अपघातानंतर आरोपी वाहन चालक पळून गेला.
घटनास्थळी नागरिकांची गर्दी जमली. हुडकेश्वर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. जखमी निखिलला उपचारार्थ मेडिकल रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. निखिलचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. पोलिसांनी अज्ञात वाहनचालकावर गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरू केला आहे.
24 एप्रिल रोजीच निखिलचे लग्न झाले होते. त्याने नव्या आयुष्याची अनेक स्वप्ने रंगवली होती. घरात सर्वत्र लग्नाची धामधूम होती. तिसऱ्या दिवशी लग्नसमारंभातून तो मोकळा झाला. शनिवारी घरमालकाची दुचाकी घेऊन तो काही कामाने घराबाहेर पडला. तत्पूर्वी पत्नीला, काम आटोपून लवकर येतो, असे सांगितले. पत्नी त्याची प्रतीक्षा करत होती. मात्र, तो आलाच नाही, त्याच्या जागी त्याचे पार्थिवच घरी पोहोचले.