नागपूर : भरधाव जाणाऱ्या कारने विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीला जोरात धडक दिली. यात दुचाकी चालक गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास सावनेर-केळवद मार्गावरील मंगसा शिवारात घडली. यामध्ये प्रकाश केशवराव कारेमोरे (वय 45, रा. खुरजगाव, ता. सावनेर) असे जखमीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जखमी प्रकाश हे रविवारी सायंकाळी दुचाकीने केळवदहून सावनेरकडे जात होते. दरम्यान मंगसा शिवारात विरुद्ध दिशेने भरधाव येणाऱ्या तवेरा कारने दुचाकीला जबर धडक दिली. यात प्रकाश यांना गंभीर दुखापत झाली. माहिती मिळताच साजाजिक कार्यकर्ते हितेश बन्सोड यांनी घटनास्थळ गाठून जखमी प्रकाश यांना सावनेर ग्रामीण रुग्णालयात नेले. येथे प्रथमोपचार देत त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर मेडिकल रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान, केळवद पोलिसांनी पंचनामा केला. घटनेवेळी चालक वाहन सोडून पसार झाला. केळवद पोलिसांनी आरोपी चालकाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार प्रशांत केसर व मंगेश धारपुरे करत आहेत.