नागपूर : घरातून निघताना वडिलांनी फ्रुटी व चिप्स आणण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे चिमुकली रात्री उशिरापर्यंत जागून वडिलांची प्रतीक्षा करत होती. मात्र, काळाच्या मनात काही वेगळेच होते. रस्त्यात भरधाव जीप चालवत असलेल्या तरुणाने तिच्या वडिलांच्या दुचाकीला जबर धडक दिली. ज्यात गंभीर जखमी होऊन वडिलांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आणि ती चिमुकली वडिलांची प्रतीक्षाच करत राहिली. ही दुर्दैवी घटना मनीषनगर उड्डाणपुलावर घडली.
भोजराज नत्थू मांडवकर (वय 32, रा. चुनाभट्टी) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी जीप चालक अक्षय प्रमोद त्यागी (वय 18, रा. गाझियाबाद, दिल्ली) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. भोजराज हे धंतोली येथील स्पेक्ट्रम डायग्नोसिसमध्ये रिसेप्शन मॅनेजर होते. त्यांना 8 वर्षांची एक मुलगी आहे. रविवारी सायंकाळी 7.30 वाजताच्या सुमारास काही कामानिमित्त घरून निघाले होते. या दरम्यान मुलीने फ्रुटी आणि चिप्स घेऊन देण्यासाठी वडिलांकडे हट्ट धरला. भोजराज यांनी तिला घरी परतताना दोन्ही वस्तू आणण्याचे आश्वासन दिले आणि दुचाकी घेऊन निघाले.
रात्री साडेनऊच्या सुमारास मनीषनगर उड्डाणपुलावरून पुरुषोत्तम बाजारकडे जात होते. या दरम्यान जीपचालक अक्षयने भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवून भोजराजच्या दुचाकीला जबर धडक दिली. यात भोजराज गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच बेलतरोडी पोलिस घटनास्थळावर पोहोचले. भोजराजला उपचारार्थ खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान भोजराज यांचा मृत्यू झाला.