सौजन्य - सोशल मिडीया
पिंपरी : पवना धरणात १८ वर्षीय तरुण बुडाल्याची घटना रविवारी (दि.२३) सायं ५ वाजण्याच्या सुमारास फांगणे (ता. मावळ) येथे ही घटना घडली. अद्ववेत सुदेश शर्मा (वय १८, सध्या रा. विमाननगर, मूळ – दिल्ली) असे धरणात बुडालेल्या तरुणाचे नाव असून तो सिम्बायोसिस कॉलेज येथे शिकत होता.
लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे येथील पाच मित्र -मैत्रिणी पवना धरण परिसरात फिरण्यासाठी आले होते. तो पाण्यात पोहण्यासाठी उतरला होता. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तरुण बुडाला असल्याचे लोणावळा ग्रामीण पोलीसांकडून सांगण्यात आले आहे.
या घटनेची माहिती मिळताच लोणावळा ग्रामीणच्या पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत घटनेची पाहणी केली. शिवदुर्ग रेस्क्यू टिम, लोणावळा व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने तरुणाला शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. घटनेची माहिती मयताच्या नातेवाईकांना देण्यात आली असून, या घटनेचा पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करत आहेत.