File Photo : Death
नागपूर : नोकरी लागल्याच्या आनंदात मित्रांना पार्टी देऊन घरी परतत असलेल्या तरुणाच्या दुचाकीला भरधाव चारचाकी वाहनाने धडक दिली. यात गंभीर जखमी होऊन तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी मध्यरात्री उदननगर परिसरात घडली. नोएल अविनाश पंडित (वय 23, रा. गंगा-सोना अपार्टमेंट) असे मृताचे नाव आहे.
नोएलचे वडील अविनाश पंडित हे रेल्वेच्या तांत्रिक विभागात नोकरीला होते. नोएलने अभियांत्रिकीचे पदवी घेतले होते. तीन महिन्यांपूर्वी त्याच्या वडिलांचा कामावर असताना अपघाती मृत्यू झाला. नोएलला त्यांच्या जागी अनुकंपा तत्वावर रेल्वेत नोकरी मिळाली. सर्व प्रक्रिया पूर्ण झाली होती. मंगळवारीच त्याने वैद्यकीय प्रमाणपत्रही सादर केले होते. पुढच्या आठवड्यापासून त्याला कामावर रुजू व्हायचे होते. त्याने मित्रांसाठी पार्टीचे आयोजन केले.
मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास 5 मित्रांना घेऊन ढाब्यावर गेला. रात्री बारा वाजताच्या सुमारास जेवण आटोपून मोटारसायकलने घराकडे निघाला. मानेवाडा चौक ते उदयनगर चौक रिंगरोडवर अज्ञात चारचाकी वाहनाने त्याच्या मोटारसायकलला धडक दिली. यात त्याला गंभीर दुखापत झाली. उपचारार्थ मेडिकल रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. हुडकेश्वर पोलिसांनी अज्ञात वाहन चालकावर गुन्हा नोंदविला आहे.