परळी : फेसबुकवरची मैत्री आपल्या कधीही अंगलट येऊ शकते. विशेषतः फेसबुक वापरणाऱ्या महिलांनी याबाबतीत काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर जे काही विपरीत घडते ते अंगावर काटे आणणारे असते. असाच काहीसा प्रकार परळी शहरातील एका गृहिणीसोबत घडला असून, याप्रकरणी या महिलेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.
परळी वै येथील शारदानगर भागातील ३२ वर्षीय गृहिणी महिलेची आरोपी अकबर बबन शेख (वय २३, रा. तेलगावनाका इंदिरानगर, बीड) याने महिलेशी फेसबुक अकाउन्टवर ओळख करुन घेतली. त्यानंतर आरोपीने गैरफायदा घ्यायला सुरुवात करुन महिलेस ब्लॅकमेल करणे सुरु झाले. आरोपीने महिलेच्या घरी जाऊन इच्छेविरुद्ध जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. तसेच १३ मार्च रोजी फिर्यादीच्या पतीला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. महिलेला चापटा-बुक्याने मारहाण केली.
२ एप्रिल रोजी महिलेच्या घरी कोणी नसताना सकाळी आरोपीने घरी जाऊन ‘तू मला कॉल करून का बोलत नाहीस?’ असे म्हणून महिलेचा विनयभंग केला. त्यास प्रतिकार करत असताना त्याने डोक्यात मारुन जखमी केले. हातालाही मारहाण करून जखमी केले. याप्रकरणाची फिर्याद दिल्यानंतर आरोपी अकबर बबन शेख याच्याविरुद्ध परळीच्या संभाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.