मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. राज्यातील शेवटच्या टप्प्यात मुंबई महानगर क्षेत्रातील दहा मतदारसंघांसह नाशिक, धुळे आणि दिंडोरी या जागांवर मतदान होत आहे. मात्र काही ठिकाणी मतदारांना त्रास सहन करावा लागतोय. अभिनेते आदेश बांदेकर यांनी इन्स्टाग्रामवर लाइव्ह करत संताप व्यक्त केला आहे. पवईतील एका मतदान केंद्रावरून त्यांनी हे लाइव्ह केलं होतं. 57 आणि 58 या दोन्ही मतदान केंद्रांवरील ईव्हीएम मशीन बंद पडल्याने मतदारांना तासनतास प्रतीक्षा करावी लागत असल्याची तक्रार बांदेकर यांनी केली आहे
आदेश बांदेकर व्हिडीओ शेअर करत म्हणाले, “मी आता पवई मतदान केंद्रावर आलो आहे. हा हिरानंदानीसारखा अतिशय सुशिक्षित विभाग आहे. याठिकाणी तुम्ही मतदारांच्या काय प्रतिक्रिया आहेत याचा अंदाज घेऊ शकता. कारण, याठिकाणच्या ५७, ५८ या दोन्ही पोलिंग बूथवरील याद्या बंद झाल्या आहेत. तसेच ईव्हीएम मशिन्स देखील बंद आहेत. हिरानंदानी फाऊंडेशन स्कूल याठिकाणचा हा प्रकार आहे. सकाळपासून सगळ्या मशिन याठिकाणी बंद आहेत. आम्ही एवढा वेळ उभे आहोत पण, कोणीच उत्तर देत नाहीये.”
“सकाळपासून जे लोक आलेत ते सगळे ३-३ तास रांगेत उभे आहेत. वयस्कर लोक घरी निघून गेले आहेत. इथे कुठल्याच प्रकारची काहीच सोय नाही. आता तीन ते चार तास झाले आहेत. हे अत्यंत चुकीचं आहे.” असं सांगत आदेश बांदेकर यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.