राजगुरूनगर : उत्तर पुणे जिल्ह्यातील अग्रगण्य सहकारी बँक समजल्या जाणाऱ्या राजगुरुनगर बँकेच्या निवडणूकीसाठी प्रशासन सज्ज झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा खेड सहकारी संस्था सहायक निबंधक हरिश्चंद्र कांबळे यांनी दिली. या निवडणुकीसाठी येत्या रविवारी (दि. ६ नोव्हेंबर) सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान होणार आहे. बँकेच्या १७ शाखांसाठी १५ ठिकाणी २९ हजार २१९ सभासद मतदारांना एकूण ६४ मतदान केंद्रांवर मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. किरण आहेर यांच्या भिमाशंकर सहकारी पॅनल आणि गणेश थिगळे यांच्या राजगुरुनगर सहकार पॅनलमध्ये ही निवडणूक होणार आहे.
सर्वसाधारण गटातील १२ जागांसाठी किरण आहेर, समीर आहेर, दिनेश ओसवाल, ऍड. निलेश आंधळे, विष्णू (अप्पा) कड, संतोष काचोळे, ऍड.. अंकुश कोहिनकर, डॉ. सीए. किसन गारगोटे, बाळासाहेब गारगोटे विनायक घुमटकर, ऍड. राहुल तांबे, अरुण थिगळे, गणेश थिगळे, सतीश नाईकरे, विश्वास नेहेरे, सागर पाटोळे, दत्तात्रय भेगडे, किरण मांजरे, राजेंद्र वाळुंज, कालिदास सातकर, माणिक सातकर, राजेंद्र सांडभोर, सुभाष होले असे एकूण २३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
महिला गटातील दोन जागांसाठी विजया शिंदे, हेमलता टाकळकर, अश्विनी पाचारणे यांच्यात तिरंगी लढत होत आहे. भटक्या जाती जमाती, विशेष मागास प्रवर्गाच्या एका जागेसाठी ऍड. डी. के. गोरे व रामदास धनवटे यांच्यात दुरंगी लढत होत आहे. ओबीसी गटातील एका जागेसाठी तिरंगी लढत होत असून धनंजय कहाणे, अविनाश कहाणे व धनंजय भागवत नशीब आजमावत आहेत. या निवडणुकीत खेड तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष तथा पुणे जिल्हा भीमशक्ती संघटनेचे अध्यक्ष विजय शिवराम डोळस हे अनुसूचित जाती / जमाती गटातून बिनविरोध निवडून आले आहेत.
या ठिकाणी आहेत मतदान केंद्र
राजगुरूनगर येथे तब्बल २७ मतदान केंद्रातून १३ हजार ३४५ मतदारांना मतदान करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. महात्मा गांधी विद्यालय, शेठ केशरचंद पारख प्राथमिक विद्यालय, खेड तालुका एज्युकेशन सोसायटीच्या केटीईएस इंग्रजी माध्यम विद्यालय या तीन ठिकाणी मतदान होणार आहे.
चाकण येथे शिवाजी विद्यामंदिर आणि सीताबाई भिकोबा पाटोळे कनिष्ठ महाविद्यालय येथील १० मतदान केंद्र असून तेथे ४ हजार ९६९, कडूस येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत २ हजार ७६७, पाईट येथे जिल्हा परिषद शाळेत मतदान केंद्र असून ३४७, महाळुंगे इंगळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ४१०, श्री क्षेत्र आळंदी येथे नगरपरीषदेच्या शाळा क्रंमाक १ मध्ये २८९ मतदार मतदान करणार आहेत.
देहूरोड व आकुर्डी परिसरातील मतदारासाठी देहुरोड कॅंटोन्मेंट बोर्डाच्या महात्मा गांधी प्राथमिक विद्यालय मराठी शाळेत १२४९, भोसरी येथील छत्रपती श्री शिवाजी महाराज प्राथमिक विद्यालयात १९४० मतदारांच्या मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. पुणे येथील बुधवार पेठेतील विद्या प्रसारणी सभेचे शेठ हिरालाल सराफ प्रशाला मतदान केंद्रावर ४९३ मतदारांच्या मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे.
शिरूर तालुक्यात पाबळ येथे श्री भैरवनाथ विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात ३५७, शिरूर येथील नगरपालिकेच्या सेंटर शाळा क्रंमाक ४ मध्ये ४३६ मतदारांना मतदान करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ मध्ये ५९३ आणि जुन्नर तालुक्यातील जुन्नर शहरातील नगरपरिषदेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक विद्यालयात १२१, नारायणगाव जिल्हा परिषद शाळेतील केंद्रावर १७५३ व आळे येथील जिल्हा परिषद शाळेत मतदान केंद्रावर १५० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.