निवडणुकीपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थता; अजित पवारांनी बोलावली तातडीची बैठक (Photo Credit- Social Media)
राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी ‘लाडकी बहीण योजना’ सध्या संपूर्ण देशभरात चर्चेचा विषय ठरत आहे. इतर योजना, प्रकल्प, योजना राबवण्यासाह राज्य सरकारने लाडक्या बहिणींचा हफ्ता देण्यासाठी केंद्र सरकारकडे कर्जाची मागणी केली आहे. लाडकी बहीण योजना सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकली असतानाच राज्य सरकार या योजनेच्या पुढील टप्प्यात आणखी एक नव्या योजनेचा विचार करत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भातील संपूर्ण आराखडा नुकताच जाहीर केला.नांदेडमध्ये काल बोलताना अजित पवार यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण घोषणा केली.
अजित पवार म्हमाले की, लाडकी बहिणींना स्वतःचा व्यवसाय सुरू करता यावा यासाठी सरकार भांडवल पुरवणार आहे. या योजनेअंतर्गत महिलांना उद्योग सुरू करण्यासाठी ३० ते ४० हजार रुपये भांडवल स्वरूपात देण्याचा विचार आहे. या योजनेसाठी सरकार बँकांसोबत चर्चा करणार आहे. विशेष म्हणजे, लाडकी बहीण योजनेतून मिळणारे दरमहा १५०० रुपये थेट संबंधित महिलांच्या बँक खात्यांत जमा होणार असून, त्याचाच उपयोग भांडवलासाठी केला जाणार असल्याचे संकेत पवार यांनी दिले.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, “राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेबाबत आणि आमच्याबाबत गैरसमज पसरवले जात आहेत.. आम्ही महिलांना दर महिन्याला १५०० रुपये देतो. या योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांसाठी ही योजना कधीच बंद होणार नाही. या योजनेमुळे महिलांना आर्थिक मदत मिळते आणि त्यांच्या आयुष्यात बदल घडतो.”
“राज्य सरकारने आणखी एक प्रस्ताव आणला आहे, आणि त्यासाठी बँकांशी चर्चा सुरू आहे. काही जिल्हा मध्यवर्ती बँका चांगले काम करत आहेत. आमचा विचार आहे की १५०० रुपयांऐवजी थेट ३० ते ४० हजार रुपये महिलांना एकरकमी दिले जावेत. हा हप्ता ‘लाडकी बहीण’ योजनेतून वळता करता येईल. भांडवल मिळाल्यास महिला स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात आणि आपले कुटुंब सक्षमपणे उभं करू शकतात.”महाराष्ट्रातील काही बहिणींनी आधीच हा मार्ग अवलंबला आहे. तुम्हीही त्याचा विचार करा. आम्ही हा कार्यक्रम सुरू करणार आहोत आणि त्याचा फायदा तुम्ही जरूर घ्या,” असे आवाहन अजित पवारांनी केले.