ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या ठाणे (Thane) शहरानजिकच्या कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एकाच रात्रीत 18 रुग्णांच्या मृत्यूच्या वृत्तानं खळबळ उडालीय. या घटनेनं या रुग्णालयातील भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आल्याचं सांगण्यात येतंय. वर्षाकाठी या रुग्णालयावर 100 कोटी रुपये खर्च करण्यात येतात, मात्र तरीही अनेक सुविधा या रुग्णालयात नसल्याचं समोर आलेलं आहे. या घटनेनंतर आता छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाकडून सारवासारव करण्यात येतेय. जिल्हा रुग्णालय बंद असल्यानं कळव्याच्या या रुग्णालयावर ताण वाढल्याचा दावा, रुग्णालयाच्या प्रशासनाच्या वतीनं करण्यात येतोय. दोन महिन्यांपासून जिल्हा रुग्णालय बंद आहे. मात्र या दोन महिन्यांत आपल्यावरील ताण वाढतोय याची कल्पना रुग्णालय प्रशासनाला नव्हती का, असाही सवाल आता उपस्थित होतोय.
रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं मोठी वाढ
पावसाळा सुरु असल्यानं साथीचे रोग वाढले आहेत. त्यामुळं रुग्णांच्या संख्येत अचानक वाढ झाल्याचा दावाही करण्यात येतोय. ताप येणं, डोळ्यांची साथ, इतर आजारांच्या साथीमुळंही रुग्णसंख्या वाढलेली आहे. सध्या कळव्याच्या या रुग्णालयात दररोज ओपीडीत 2200 रुग्ण उपचार घेतायेत. या रुग्णालयातील बेडची संख्या 500 आहे तर दाखल रुग्णांची संख्या 566 इतकी आहे. रुग्णांची संख्या वाढल्यानं तात्पुरत्या स्वरुपात खाटा लावण्यात आल्या असल्या, तरी जागा कमी पडत असल्याचा दावा रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात येतोय. आयसीयूतील 40 बेडही फुल आहेत. या रुग्णालयावर दरवर्षी 100 कोटींपेक्षा जास्त खर्च करण्यात येतो. मात्र तरीही या ठिकाणी रुग्णांसाठी योग्य सुविधा का नाहीत, अशीही विचारणा होतेय. या रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांवर चांगल्या दर्जाचे उपचार होत नाहीत, अशीही तक्रार नोंदवण्यात येतेय.
काय आहे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची संख्या ?
या रुग्णालयात डॉक्टरांची संख्या पुरेशी असल्याचं कागदोपत्री दिसतंय. रुग्णालयात एकूण 800 कर्मचारी आहेत. त्यात निवासी डॉक्टरांची संख्या 150, वैद्यकीय प्राध्यापकांची संख्या 125 आणि परिचारिकांची संख्या 180 च्या घरात आहे. आता या घटनेनंतर या रुग्णालयातील बेडची संख्या आणखी 500 नी वाढवणार असल्याचं प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात येतंय. त्यासाठी 60 कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे.






