संग्रहित फोटो
मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले आहे. सर्व एक्झिट पोलचे निष्कर्ष खोटे ठरवत महायुतीने जोरदार मुसंडी मारली आहे. अशातचं आता काँग्रेस अॅक्शन मोडवर असून, महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथल्ला १७ डिसेंबर २०२४ रोजी काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित विधानसभा सदस्य, विधान परिषद सदस्य व २०२४ च्या विधानसभा निवडणुकीतील पक्षाचे सर्व उमेदवार यांच्याशी नागपूरमध्ये चर्चा करणार आहेत. नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात ही चर्चा होणार असून, सकाळी ११ वाजता आमदारांशी तर दुपारी १ वाजता विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांशी स्वतंत्रपणे चर्चा करणार आहेत.
नागपूर येथे होत असलेल्या या महत्वपूर्ण चर्चेला संबंधित सर्वांनी उपस्थित रहावे, असे निर्देश महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे यांनी दिली आहे.
हे सुद्धा वाचा : इंदापुरात शरद पवार गट आक्रमक; ईव्हीएम हटाओ देश बचाओच्या जोरदार घोषणा
राज्यात महायुतीला यश
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा पूर्ण निकाल पाहिले तर महायुतीला मोठं यश मिळाले आहे. महाराष्ट्र निकालाचा अंतिम आकडा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. महाराष्ट्रात 288 पैकी 132 जागांवर भाजपला यश आलं आहे. त्यापाठोपाठ एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला यश मिळालं आहे. शिंदे गटाला 57 जागांवर यश मिळालं आहे. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 41 जागांवर यश मिळालं आहे. यावरुन आता काँग्रेस अॅक्शन मोडवर आहे.
दुसरीकडे महाविकास आघाडीला केवळ 46 जागांवर यश मिळालं आहे. यामध्ये ठाकरे गटाला सर्वाधिक 20, काँग्रेसला 16 आणि शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला केवळ 10 जागांवर यश मिळालं आहे. या निवडणुकीत समाजवादी पक्षाला 2 आणि अपक्षांना 10 ठिकाणी यश आलेलं आहे. पण मनसे आणि वंचित बहुजन आघाडी या दोन्ही पक्षांना खातंदेखील उघडता आलेलं नाही.
अधिवेशनात विरोधी पक्षनेता होईल – पटोले
महाराष्ट्र विधिमंडळाला एक मोठी परंपरा लाभलेली आहे. अनेकदा काँग्रेसकडे मोठे बहुमत असतानाही त्यावेळी विरोधी पक्षांची सदस्य संख्या न पहाता विरोधी पक्षनेते पद दिले होते. हीच परंपरा लक्षात घेऊन विधानसभेचा विरोधीपक्ष नेता व विधानसभेचा उपाध्यक्ष विरोधी पक्षांचा असावा अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेत मांडली आहे. सरकारही सकारात्मक असून, नागपूर अधिवेशनात विरोधी पक्षनेता होईल अशी अपेक्षा आहे, असे नाना पटोले म्हणाले.