बारामती / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकारने जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी लावलेला आहे. तो रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी रिपब्लिकन सेनेचे संस्थापक अध्यक्ष आनंदराज आंबेडकर (Anandraj Ambedkar) यांच्या आदेशानुसार व प्रदेश युवा अध्यक्ष किरण घोंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली बारामतीत लक्षवेधी आंदोलन करण्यात आले.
यावेळी रिपब्लिकन सेनेचे पुणे जिल्ह्याचे नेते प्रशांत सोनवणे म्हणाले, मुघलांनी आणि ब्रिटिशांनी सुध्दा भाकरीवर टॅक्स लावला नाही. पण या सरकारने जीवनावश्यक वस्तूंवर टॅक्स लावून सर्वसामान्य जनतेवर अन्याय केला आहे. अगोदरच महागाईने जनता प्रचंड त्रस्त झाले आहे. गोरगरीब जनता या वाढत्या महागाईमुळे मोठ्या आर्थिक संकटात सापडली आहे. जीवनावश्यक वस्तूंवर सेवा कर लावणे म्हणजे भाकरीवर कर लावल्यासारखे आहे.
भाकरीवर टॅक्स लावणाऱ्या केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकारचा जाहीर निषेध आम्ही करत असून, हा कर रद्द करून गोरगरिबांना न्याय द्यावा. अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा सोनवणे यांनी यावेळी दिला. यावेळी बारामती तालुका अध्यक्ष अनिल कवडे, शिकिदा भोसले बारामती तालुका महासचिव उमेश साळवे, बारामती तालुका उपाध्यक्ष कांचन भोसले, अशोक शिंदे गणेश भोसले आदींसह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.