सध्या सोशल मीडियावर आणि गल्लीबोळात एक वेगळेच दृश्य पाहायला मिळत आहे. दुपारच्या कडक उन्हापासून वाचण्यासाठी इमारतींच्या बाजूला असलेल्या झाडांच्या सावलीत, जेथे मातीमध्ये थोडा ओलावा किंवा थंडावा आहे, अशा जागा या श्वानांनी शोधून काढल्या आहेत. कोरड्या पडलेल्या जमिनीवर झाडांच्या छत्रछायेखाली ही कुत्री शांतपणे सुस्तावलेली आणि विश्रांती घेताना दिसत आहेत. माणसांप्रमाणेच त्यांनाही या दिवसांत थंड जागेची किती तीव्र गरज असते, हेच या दृश्यावरून अधोरेखित होते.
विश्रांती घेतानाच उन्हाळ्यात सर्वात मोठी समस्या असते ती पिण्याच्या पाण्याची. यातीलच एका जागरूक श्वानाने तर आपल्या शेजारीच पाण्याची रिकामी बाटली ठेवून जणू ‘पाण्याची सोय करा’ असाच संदेश दिला आहे. प्राणीप्रेमींकडून उन्हाळ्याच्या दिवसांत या मुक्या प्राण्यांसाठी ठिकठिकाणी पाण्याच्या कुंड्या ठेवण्याचे आवाहन केले जात आहे.
ऋतू कोणताही असो, निसर्गाच्या लहरीपणाचा फटका या रस्त्यावरील प्राण्यांना बसत असतो. सध्या वाढत्या उन्हामुळे या मुक्या जिवांची अवस्था बिकट होते. त्यामुळे आपल्या घराबाहेर किंवा सोसायटीच्या आवारात प्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याची भांडी ठेवावीत. शक्य असल्यास त्यांना दुपारच्या वेळी सावलीत आश्रय घेऊ द्यावा, निसर्गाच्या या आव्हानाचा सामना करत, या चतुर श्वानांनी शोधलेला हा थंडगार निवारा सध्या येणाऱ्या-जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.






